
पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचे दावे केले जातात. परंतु, पुण्यातील विमानतळ परिसरात 28 वर्षीय परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही तरुणी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. दरम्यान, दोन नराधमांनी या तरुणीला लिफ्ट देऊन तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मंगळवारी मध्यरात्री 12 ते पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पीडित तरुणी ही मुळची युगांडा देशातील आहे. ही तरुणी पुण्यातील कोंढवा परिसरात आपल्या बहिणीसोबत राहते. पीडित तरुणीने अज्ञात नराधमांविरोधात सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही तरुणी टुरिस्ट व्हिसावर भारतात आली आहे. सोमवारी रात्री ती मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. रात्री उशीर झाल्यामुळे ती घरी जाण्यासाठी कॅब बुक करत होती. त्यावेळी एक तरुण बाईकवर तिच्याजवळ आला. त्याने या तरुणीला लिफ्ट देतो असे सांगितले. तेव्हा तरुणी त्या अज्ञात तरुणाच्या बाईकवर बसली. थोड्यावेळात त्या व्यक्तीला एक फोन आला. त्यानंतर काही वेळातच दुसरी व्यक्ती त्याठिकाणी आली. (हेही वाचा- नाशिक: शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार; बदनामीची धमकी देत मोबाइलमध्ये केले चित्रिकरण)
या दोन्ही नराधमांनी परदेशी तरुणीला बळजबरीने गाडीवर बसवले. त्यानंतर तिला विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेले. तेथे या दोघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला तेथेच सोडून दिले. पंरतु, तरुणीने या निर्जनस्थळी सोडून जाऊ नका, अशी विनंती केली.
दरम्यान, मुख्य रस्त्यावर आल्यानंतर या तरुणीला तेथे काही तरुण उभे असलेले दिसले आणि तिने आरडा-ओरड सुरू केली. परंतु, या गोंधळात हे तिघेही दुचाकीवरून खाली पडले. यामध्ये तरुणी जखमी झाली. दरम्यान, हा प्रकार पाहिल्यानंतर रस्त्यावरील तरुणांनी या तिघांकडे धाव घेतली. परंतु, या दोन्ही नराधमांनी तेथून पळ काढला. त्यानंतर हे तरुण या पीडितेला पोलिसांकडे घेऊन गेले. तरुणीने नराधमांनी वापरलेल्या दुचाकीचा नंबर पोलिसांना सांगितला असून पोलिस आरोपींचा तपास करत आहेत.