मुंबई: BMC च्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा शॉक लागून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; 5 जण जखमी
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. BMC च्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा शॉक लागून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच 5 जण जखमी झाले आहेत. या घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या घटनेमुळे मृत पावलेल्या BMC कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे सर्व कर्मचारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करत होते. आज जलवाहिनीच्या दुरुस्तीदरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली.

गणेश दत्तू उगळे (वय, 45) आणि अमोल काळे (वय, 40) असे वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तसेच नाना पुकाले (वय, 41), महेश जाधव (वय, 40), नरेश अंधगले (वय, 40), राकेश जाधव (वय, 39) आणि अनिल चव्हाण (वय, 43) अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (हेही वाचा - Fire Break Out at Mumbra: मुंब्रा येथील कौसा पेट्रोल पंपाजवळील गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल)

दरम्यान, शहरातील कुर्ला पूर्वेकडील सुमन नगर परिसरात महापालिकेच्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी BMC चे 7 कर्मचारी जववाहिनी दुरुस्तीचे काम करत होते. परंतु, दुर्दैवाने या कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागला. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. या घटनेमुळे सुमन नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.