Boy Died After Eating Shawarma: चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेकांना विषबाधा; मानखुर्द परिसरातील घटना
Photo Credit -Pexels

Boy Died After Eating Shawarma: मानखुर्द येथे रस्त्याच्या बाजूला तयार केलेला चिकन शॉरमा काहींनी २ दिवसांपूर्वी खाल्ला होता. यामुळे 10 ते 12 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यापैकीच एका तरुणाचा आता मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रथमेश भोकसे असं मृत तरुणाचं नावं आहे. तो 19 वर्षांचा होता. ट्रॉम्बे पोलिसांनी या तरुणाच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. (हेही वाचा :Nagpur Shocker: NEET परीक्षा देण्याच्या काही तास आधी फ्लायओव्हरवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या; नागपुरातील घटना )

मानखुर्द हा स्लम ऐरीया म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात फेरीवाले, गलिच्छ गल्ल्या, त्यात खाद्यपदार्थांची विक्री, बेकायदेशीरपणे व्यवसाय असे अनेक प्रकार मानखुर्दमध्ये मोठ्या प्रमाणात घडतात. अनेकांना असे छोटे स्टॉल पाहून खाद्यपदार्थ खाण्याचा मोह होतो. अगदी ताटकाळत उभं राहून खाद्य प्रेमी पदार्थंचे सेवन करतात. त्याचे दुष्परिणाम नंतर त्यांच्या आरोग्यावर जाणवू लागतात. तसाच त्रास,शॉरमा खाल्ल्यानंतर प्रथमेशला झाला आणि तो जीवावर बेतला.

शॉरमा खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने 10 ते 12 ग्राहकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास झाला. नंतर त्या सर्वांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केलं गेलं. यापैकी ज्यांची प्रकृती थोडी बिघडली होती ते बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र,प्रथमेशची प्रकृती चिंताजनक होती. त्याला दुसऱ्या दिवशीही त्रास होत होता. त्यामुळेच त्याला थेट केईएम रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. या रुग्णालयात उपचार सुरु असतानाही प्रथमेशची प्रकृती खालावत गेली आणि मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.