चंद्रपूरातील (Chandrapur) राजुरा तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, सिंधी गावातील एक शेतक-याची त्याच्याच 18 वर्षाच्या मुलाने हत्या करुन त्याचा मृतदेह रेल्वे रुळामध्ये फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिरूपती तातोबा धानोरकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी विरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अवघ्या 8 तासात खुनाचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे. आरोपी निखिल धानोरकर याला अटक करण्यात आली असून या गुन्ह्यात त्याला मदत करणा-या त्याच्या मित्रास देखील अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधी गावापासून अर्धा कि.मी. अंतरावरील जंगलात असलेल्या रेल्वे रुळावर गावातील तिरुपती धानोरकर या शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला. त्यानंतर गावक-यांनी पोलिसांना या घटनेची खबर दिली. मृतदेहाचा पंचनामा करताना मृताच्या डोक्यावर व अन्य जागी मार असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद समजून पोलिसांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना माहिती देऊन तपास सुरू केला.हेदेखील वाचा- Murder Case In BKC: मुंबई मध्ये बीकेसी परिसरामध्ये 96 तास तपासानंतर पोलिसांनी आवळल्या खुन्याचा मुसक्या
या दिशेने तपास सुरु असताना आरोपीचे आणि त्याच्या वडिलांचे शेती विकण्यावरुन वाद सुरु असल्याचे कळाले. रागाच्या भरात निखिलने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली. आणि त्यांचा मृतदेह मित्राच्या मदतीने रुळांवर फेकून ही आत्महत्या असल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी योग्य तो तपास करुन आरोपी निखिल आणि त्याच्या साथीदारास गजाआड केले.
मृतदेहावरील मारहाणीच्या खुणा व जखमा याच्यावरून ही आत्महत्या नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तातडीने पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.