Stop Rape (Representative image)

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार (Rape) करून गर्भधारणा केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वृत्तसंस्थेनुसार, मुलीच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी शनिवारी कलम 376 (बलात्कार) आणि भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईतील कोपर खैराणे येथे आपल्या भावाला भेटायला गेलेली मुलगी रुग्णालयात गेली असता ती 34 आठवड्यांची गरोदर असल्याचे आढळून आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. तक्रारीनुसार, उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमधील एका गावात राहणाऱ्या तरुणीवर एप्रिलच्या आधी आरोपीने बलात्कार केला होता. पुढील तपासासाठी नवी मुंबई पोलिसांनी हे प्रकरण सिद्धार्थनगर पोलिस ठाण्यात वर्ग केले आहे. (हेही वाचा - Mumbai News: 63 वर्षीय महिलेला पतीकडून अत्याचार, आरोपीवर गुन्हा दाखल, दहिसर येथील घटना)

दरम्यान, आणखी एका घटनेत नवी मुंबईतील एका तरुणीने अलीकडेच तिच्या सावत्र वडिलांवर दोन वर्षांपासून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी वाशी येथील 35 वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, 15 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे जाऊन बुधवारी वाशी येथील एपीएमसी पोलिस ठाण्यात तिच्या सावत्र वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. ऑक्टोबर 2021 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत तिच्या सावत्र वडिलांनी वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ऑक्टोबर 2021 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान पीडितेच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तिने आरोप केला की तो तिला मारहाण करायचा आणि लाथ मारायचा. सततच्या छळाला कंटाळून मुलीने भूमिका घेण्याचे ठरवले. हिंमत दाखवून तिने पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींवर कलम 376 (2) (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे), 377 (अनैसर्गिक गुन्हा), 323 (स्वच्छेने दुखापत करणे) आणि 506 (2) (गुन्हेगारी धमकावणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.