Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत देखील मोठा झटका बसत आहे. कारण बालेकिल्ला पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी राजीनामे दिले आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह 15 पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सकाळी 11 वाजता पक्ष प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या मोदी बाग या निवासस्थानी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड हा बालेकिल्ला समजला जातो. परंतु चिंचवड आणि भोसरीमध्ये सध्या भाजपचा आमदार आहे. मात्र, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार विलास लांडे, स्थायी समितीचे मा.अध्यक्ष अजित गव्हाणे यांसह भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तरी यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.