शासकीय रुग्णालय आणि तेथील प्रशासनाचा अनागोंदी कारभार हे जणू समीकरणच बनले आहे. त्याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे यवतमाळमध्ये सिझेरियनद्वारे प्रसुती(cesarean) झालेल्या 14 महिलांना इन्फेक्शन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. या इन्फेक्शमुळे गेल्या महिन्याभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.
ह्या रुग्णालयात 21 एप्रिलला सिझेरीयनद्वारे प्रसुती झालेल्या 14 महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार केली होती. मात्र औषधांनी बरं वाटेल असं सांगत डॉक्टरांनी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महिन्याभरापासून नेमके काय उपचार सुरु आहेत याबद्दल महिलांच्या नातेवाईकांनी चौकशी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तसेच डॉक्टरांकडून चांगली वागणूक दिली जात नसल्याचा आरोप महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.
रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आल्यानंतर माहिती घेण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना रुग्णालयात कॅमेरा घेऊन जाण्यास अडवण्यात आले. शिवाय रुग्णाच्या नातेवाईकांसोबत बोलण्यासही मनाई करण्यात आली.
ह्याबाबत अधिक माहिती देताना रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय भारती यांनी सांगितलं की, इन्फेक्शन बाबतच्या तोंडी तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. या तक्रारींवरुन 5 सदस्यीय इन्फेक्शन कंट्रोल कमिटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत, यासाठी काळजी घेतली जाईल, असंही डॉ. भारती यांनी सांगितलं.