
Nashik Accident: नाशिक जिल्ह्यातून अपघाताची (Accident) हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. सोमवारी सकाळी सायकलने शाळेत जाणाऱ्या एका 12 वर्षीय शाळकरी मुलीचा भरधाव डंपरने चिरडले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. नाशिक ते संभाजीनगर महामार्गावर चांदोरी गावाजवळील नागपूर फाटा परिसरात ही घटना घडली. माध्यमांच्या वृत्तानुसार, पीडितेचे नाव सिद्धी मंगेश लुंगसे असे आहे, ती चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत शिकणारी विद्यार्थिनी होती. या भीषण अपघातात सिद्धीचा जागीच मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, भरधाव डंपरने मुलीच्या सायकलला धडक दिली. त्यानंतर डंपरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीलाही धडक दिली. यात मोटारसायकलवरून जाणारे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी जमून निषेध व्यक्त केला. त्यांनी चांदोरी ते निफाड रस्ता रोखला आणि डंपर चालकावर कडक आणि जलद कारवाईची मागणी केली. (हेही वाचा - Mumbai Metro Child Safety: मेट्रोमधील अपघात टळला, सतर्क कर्मचाऱ्यामुळे 2 वर्षांच्या बालकाचा जीव वाचला)
दरम्यान, या निषेधामुळे सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहतूक ठप्प झाली. अपघातानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांची समजूत घालून आणि डंपर चालकाविरोधात कडक कारवाईचे आश्वासन देऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.