दुबईहून पुण्यात दाखल झालेल्या विमानातील 115 प्रवाशांपैकी 46 प्रवाशांना सणस मैदानावरील हॉस्टेलकडे 'क्वारंटाइन' (Quarantine) करण्यात आलं आहे. या प्रवाशांना ताब्यात घेण्यासाठी पुणे महापालिकेचे पथक पहाटे तीनपासूनच विमानतळावर तैनात होते. यातील एका प्रवाशाला त्रास होत असल्याने त्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच 114 प्रवाशांपैकी 6 प्रवाशांना काही प्रमाणात त्रास जाणवत असल्याने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महापालिकेच्या पथकाने दुबईहून पुण्यात आलेल्या विमानातील भारतीयांची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी केली. परंतु, यात कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. यातील सर्व प्रवाशांकडून फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. यातील एका नागरिकांनी स्वत: हून आजारी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रवाशाला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - पुण्यातील सर्व पेट्रोल पंप आज दुपारनंतर बंद; 21 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
पुणे महानगरपालिका प्रशासनाने दुबईवरून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची तापसणी करण्यासाठी खास तयारी केली होती. यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शात्ननू गोयल, मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख राजेंद्र मुठे, डॉक्टर्स आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने पहाटे 3 वाजताच विमानतळावर दाखल झाले होते. यातील प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास संबंधित प्रवाशांना 14 दिवसांसाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन बद्दल कोणतीही सुचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे विमानतळावर दाखल झाल्यानंतर सर्व प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला.