रेल्वे विभागाकडून सातत्याने रेल्वे रुळ ओलांडू नये, अशा सूचना देण्यात येतात. मात्र, प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात लोकल अथवा मेल-एक्स्प्रेसची धडक लागल्याने अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील दीड वर्षात 1 हजार 962 प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडताना आपला जीव गमवावा लागला. यात 324 प्रवासी जखमी झाले. यासंदर्भात रेल्वे पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होऊ नये यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. स्थानकात, तसेच दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशी स्थानके शोधून दोन रुळांच्या मध्ये कुंपण घालणे, रुळांच्या बाजूला सरंक्षक भिंत बांधणे यासह नवीन पादचारीपूल बांधणे आदी उपाययोजना करण्यात येतात. रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलामार्फत कारवाई करण्यात येते. मात्र कारवाई आणि उपाययोजना अपुऱ्या ठरत आहेत. (हेही वाचा -Mumbai AQI After Diwali: दिवाळीनंतर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत कमालीची घसरण; जाणून घ्या चेन्नई, बेंगळुरू कोलकात्यासह 'या' मोठ्या शहरांची हवेची पातळी)
दरम्यान, प्रवासीही निष्काळजीपणाने जीव धोक्यात घालून रूळ ओलांडत आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूळ ओलांडताना लोकल आणि मेल एक्स्प्रेसची धडक लागून 201आणि 2022 मध्ये एकूण 1 हजार 963 जणांचा मृत्यू झाला आहे. रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मध्य आणि पश्चिम उपनगरीय मार्गांवरील 15 उपनगरीय स्थानकात 17 पादचारीपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत या पुलांची उभारणी होईल. यापैकी 13 पूल मध्य रेल्वेवर, तर उर्वरित चार पूल पश्चिम रेल्वेवर उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान, अपघात रोखण्यासाठी एमआरव्हीसी, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर मागील 5 वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण 14 पादचारीपूल उभारण्यात आले आहेत. मात्र तरी देखील प्रवाशांकडून सुविधांचा उपयोग न करता सर्रास रेल्वे रुळ ओलांडण्याचा येत असल्याचे निदर्शनास आले आहे.