Mumbai AQI After Diwali: दिवाळीनंतर आणि मान्सूनच्या माघारामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 290 वर पोहोचून शहराचे ‘अत्यंत खराब’ श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले. AQI मूल्य जितके जास्त तितके आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते. मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, एकूण मुंबई विभागातील AQI 'अत्यंत खराब' श्रेणीत होता. तथापी, अंधेरीमध्ये, AQI 358 वर 'अत्यंत खराब' श्रेणीत होता. BKC आणि बोरिवलीमध्ये, AQI अनुक्रमे 293 आणि 232 वर 'खराब' राहिला. चेंबूर आणि मालाडमध्ये, AQI अनुक्रमे 319 आणि 375 वर 'खूप खराब' होता. मात्र, वरळी भागात हवेची गुणवत्ता 'समाधानकारक' श्रेणीत होती. (हेही वाचा - Bombay High Court on Marriage: पुराव्याशिवाय पतीला 'मद्यपी' आणि 'व्यभिचारी' म्हणणे क्रूरता; मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण)
दरम्यान, पुण्यात, हवेचा दर्जा 'खराब' नोंदवण्यात आला असून एकूण AQI 208 होता. पावसामुळे जुलै महिन्यात मुंबईचा AQI बहुतेक 20 च्या खाली होता. तर ऑगस्टमध्ये AQI बहुतेक 15 च्या खाली राहिल्याने मुंबईकरांना शुध्द हवेचे दिवस अनुभवायला मिळत होते. भारतात दिवाळीच्या दिवशी भरपूर फटाके उडवले जातात. फटाक्यांवर बंदी असतानाही राजधानी दिल्लीत लोकांनी भरपूर फटाके फोडले. याचा परिणाम म्हणजे मंगळवारी सकाळी देशातील हवेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम झाला. दिल्लीत प्रदूषणाने विषारी पातळी गाठली आहे. दुसरीकडे, थंडी आणि फटाक्यांमुळे देशातील इतर काही मेट्रो शहरांमधील हवेची गुणवत्ताही खालावली आहे.
राष्ट्रीय स्तरावर हवेच्या गुणवत्तेवर नजर ठेवणाऱ्या सरकारी वेबसाइटने दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर दिल्ली आणि आसपासचा परिसर दिवाळीनंतर हवा गुणवत्ता निर्देशांकात सर्वात वाईट होता. देशाच्या राजधानीत बर्याच ठिकाणी AQI 301-400 च्या श्रेणीत राहिला, जे प्रदूषणाची खराब पातळी दर्शवते. तज्ज्ञांच्या मते, या प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने श्वसनाचे आजार होऊ शकतात. AQI 401 च्या वर गेल्याने हवेची गुणवत्ता 'गंभीर' पातळीवर पोहोचते. यामुळे निरोगी लोकांना श्वसनाच्या आजाराचा धोका असतो, तसेच जे आधीच आजारी आहेत त्यांच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दिवाळीनंतरही कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील हवेची गुणवत्ता स्थिर किंवा समाधानकारक श्रेणीत राहिली. इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत येथील परिस्थिती चांगली होती. याशिवाय तामिळनाडूच्या राजधानीत AQI खूप उंचावला आहे. येथील अनेक भागात धुकेही दिसून आले. CPCB च्या आकडेवारीनुसार, चेन्नईतील AQI खराब श्रेणीत राहिला. अलंदूर बस डेपो ते रोयापुरम पर्यंत AQI 200-250 दरम्यान नोंदवले गेले. तथापी, कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये सितरंग चक्रीवादळाच्या भीतीने दिवाळी साजरी केली. याठिकाणी बर्याच भागात AQI 30 ते 60 च्या श्रेणीत नोंदवले गेले, जे चांगल्या हवेच्या गुणवत्तेची श्रेणी दर्शवते.