Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

भरधाव ट्रकने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत (Road Accident) एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्याच्या घोडबंदर परिसरात रविवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात (Kasarvadavli Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी ट्रक चालकास अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम सुंबे (वय, 72) असे मृत्य व्यक्तीचे नाव आहे. तुकाराम हे बोरिवली येथील रहिवाशी असून रविवारी ते त्यांचा मुलगा मंगेश सुंबे (वय, 44) यांच्यासह दुचाकीवरून ठाण्याकडे निघाले होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास घोडेबंदर रोडच्या नागला बंदर भागात जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तुकाराम यांचा रुग्णालयात दाखल होण्याआधीच मृत्यू झाला. तर, मंगेश यांच्या डोक्याला आणि हाताल गंभीर दुखापत झाली आहे. यासंदर्भात हिंदुस्थान टाईम्सने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यात 16 वर्षीय मुलीची गळाफास लावून आत्महत्या, पोलीस तपास सुरू

कासारवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रणभीसे यांनी हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, अविनाश कदम असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. घटनावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात मोटार वाहन कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.