
Akola News: अकोल्यात एका नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. 15 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे मुलाने दोन शालेय शिक्षकांकडून त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तो अकोल्यातील खदान परिसरातील रहिवासी होता. ( हेही वाचा- 9 वर्षाच्या मुलीवर महिनाभर सामुहिक बलात्कार, पीडितेच्या अश्लिल व्हिडिओमुळे खळबळ)
मिळालेल्या माहितीनुसार, अल्तमेश इमराण बेग असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तो अकोल्यातील शाळेत शिकत होता. ज्या शाळेत शिक्षण घेत होता तेथे त्याला दोन शिक्षकांनी मानसिक त्रास दिला होता. मानसिक त्रासाला कंटाळून अल्तमेशने टोकाचे पाऊल उचलले होते असा त्याच्या पालकांनी माहिती दिली. काही दिवसांपासून तो डिस्टर्ब झाला होता. काल शाळेत कोणत्यातरी कारणांमुळे दोन्ही महिला शिक्षकांनी अल्तमेशला मारहाण केली होती. एवढच नव्हे तर त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली असं शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांना माहिती दिली.
या घटनेनंतर अल्तमेश तणावात गेला होता. शाळेतील सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. तेव्हा घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सायंकाळी त्याने राहत्या घरातील वरच्या खोलीमध्ये अभ्यासाच्या निमित्ताने गेला. बराच वेळ तो खाली आला नाही त्यामुळे आई वरच्या खोलीत त्याला बोलवण्यास गेली. परंतु तो लटकलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी हंबरडा फोडला. ही घटना कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात सांगितली, पोलिसांनी आत्महत्या प्रकरणी नोंद केले आहे. ही घटना गुरुनानक शाळेतील असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या पालकांनी केली आहे.