World’s Best Cities 2021: जगातील सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीमध्ये राजधानी दिल्लीला मिळाले 62 वे स्थान; लंडन ठरले अव्वल, Check Full List
Delhi Tourism (Photo Credits: PTI)

एकीकडे कोरोना विषाणू (Coronavirus) संकट आणि दुसरीकडे प्रदूषण अशा समस्यांचा सामना करीत असलेल्या दिल्लीकरांसाठी (Delhi) आता एक चांगली बातमी समोर आली आहे. 2021 मधील जगातील सर्वोत्तम 100 शहरांच्या (World’s Best Cities 2021) यादीत दिल्लीला स्थान मिळाले आहे. यंदा दिल्ली 62 व्या स्थानावर आहे. दिल्लीच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीतील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. रेझोनान्स कन्सल्टन्सी लिमिटेडने (Resonance Consultancy Ltd) केलेल्या रँकिंगमध्ये दिल्लीने हे स्थान पटकावले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीत दिल्ली हे एकमेव भारतीय शहर आहे. गेल्या वर्षी 81 च्या तुलनेत यंदा दिल्लीने 62 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, ‘सर्व दिल्लीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सर्व दिल्लीकरांनी गेल्या सहा वर्षांत ही कामगिरी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. दिल्लीत होत असलेले बदल जग पाहत आहे.’ हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रेझोनन्स कन्सल्टन्सीने म्हटले आहे की, जगातील 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांची जगातील सर्वोत्कृष्ट 100 शहरांमध्ये निवड केली आहे. यासाठी स्थानिक लोकांकडून व शहरास भेट देण्यासाठी आलेल्या लोकांकडून अभिप्राय घेतला जातो. त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ही यादी ठरवली जाते.

जगातील सर्वोत्कृष्ट शहरांमध्ये लंडन सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीतील पहिल्या दहा शहरांची नावे पुढीलप्रमाणे- लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस, मॉस्को, टोकियो, दुबई, सिंगापूर, बार्सिलोना, लॉस एंजेलिस आणि माद्रिद. ज्या 25 घटकांवर हे रँकिंग अवलंबून होते त्यामध्ये सोशल मीडिया हॅशटॅग, चेकिन, हवामान, विविधता, पर्यटकांचे आकर्षण केंद्र, कोरोना प्रकरणे, बेरोजगारी आणि उत्पन्नातील असमानता यांचा समावेश आहे. (हेही वाचा: भारतामध्ये आहेत Nude Beaches? देशातील अशी काही खास ठिकाणी जिथे आढळतात Nudists लोक; मात्र देशात Naturism ला परवानगी आहे?)

या 10 शहरांव्यतिरिक्त रोम, शिकागो, टोरोंटो, सॅन फ्रान्सिस्को, अबू धाबी, सेंट पीटर्सबर्ग, अॅमस्टरडॅम, बर्लिंग, प्राग आणि वॉशिंग्टन ही शहरेही या यादीत समाविष्ट आहेत. दिल्ली हे त्याच्या गतीसाठी 18 व्या स्थानावर तर, साइट आणि लँडमार्कसाठी 29 क्रमांकावर आहे.