Space Hotel (संग्रहित संपादित प्रतिमा)

सुरुवातीपासूनच माणूस अशक्य गोष्टी शक्य करण्याचा प्रयत्न करत आला आहे. असेच काम अमेरिकेतील एक स्पेस कंपनी (Space Company) करत आहे. ही कंपनी लवकरच अंतराळात हॉटेल (Space Hotel) उघडणार आहे. अंतराळातील नेत्रदीपक दृश्यांसह हॉटेलच्या सुविधांचा आनंद घेणे हे एकाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अमेरिकन स्पेस कंस्ट्रक्शन कंपनी ऑर्बिटल असेंबली कॉर्पोरेशन (Orbital Assembly) हे स्वप्न साकार करणार आहे. 2025 मध्ये ते जगातील पहिले स्पेस हॉटेल उघडणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्याचे नाव पायोनियर स्टेशन (Pioneer Station) असेल.

अंतराळ हॉटेल बांधण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा 2019 मध्ये जगासमोर मांडण्यात आला होता. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे हॉटेल एका फिरत्या चाकाच्या आकारात असेल, जे पृथ्वीभोवती फिरेल. या हॉटेलमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना खोल्यांच्या खिडक्यांमधून अंतराळाचे विहंगम दृश्य पाहता येईल. ऑर्बिटल असेंब्लीने 2019 मध्येच स्पेस हॉटेलचे डिझाइन पूर्ण केले. आता त्याला कॅलिफोर्नियास्थित कंपनी गेटवे फाऊंडेशनकडून हे डिझाईन अवकाशात साकारण्यासाठी निधी मिळणार आहे.

हे अंतराळ हॉटेल वॉन ब्रॉन स्टेशन म्हणून ओळखले जाईल. हॉटेलमध्ये अनेक मॉड्यूल असतील, जे आवश्यकतेनुसार वाढवले ​​​​जातील किंवा कमी केले जातील. या प्रकल्पाची देखरेख ऑर्बिटल असेंबली कॉर्पोरेशन करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की पायोनियर स्टेशन व्यतिरिक्त 2027 मध्ये व्हॉयजर स्टेशन नावाचे अजून एक स्पेस हॉटेल उघडले जाईल. पायोनियर 2 आठवड्यांसाठी एकाच वेळी 28 लोकांना सामावून घेण्यास सक्षम असेल, तर व्हॉयेजरची क्षमता 400 लोक असेल. (हेही वाचा: ट्विटरचे सीईओ Parag Agrawal यांना पदावरून हटवल्यास एलॉन मस्क यांना मोजावी लागणार मोठी किंमत, द्यावे लागणार 'इतके' पैसे)

ऑर्बिटल असेंब्लीचे उद्दिष्ट स्पेस बिझनेस पार्क स्थापन करण्याचे आहे. पर्यटकही येथे येऊन अवकाशातील विलोभनीय दृश्यांचा आनंद घेऊ शकतील. ऑर्बिटल असेंब्लीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर टिम अल्लाटोर यांचा विश्वास आहे की, अंतराळ पर्यटनामध्ये ‘बजेट’ ही एक मोठी समस्या बनत असताना, येत्या काही दिवसांत ग्राहकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होणार आहे. पायोनियर स्टेशन आणि व्हॉयजर स्टेशन या दोन्ही ठिकाणी ऑफिस स्पेस आणि संशोधन सुविधा देखील भाड्याने दिल्या जातील.

कंपनीच्या म्हणण्यानुसार दोन्ही स्पेस हॉटेल्स लक्झरी असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी कृत्रिम गुरुत्वाकर्षणही असणार आहे. म्हणजेच, लोक पृथ्वीप्रमाणे आंघोळ, बसणे, चालणे आणि खाणे यासारख्या सामान्य क्रिया करू शकतील. सध्या हे तंत्रज्ञान अंतराळातील कोणत्याही स्पेस स्टेशनमध्ये नाही. कंपनीने येथे राहण्याच्या खर्चाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.