Jobs In Travel, Tourism Sector: कोविडनंतर देशातील प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ; येत्या नऊ वर्षांत निर्माण होणार 5.82 कोटी नोकऱ्या- Reports
Taj Mahal | Travel-Tourism | Pixabay

Jobs In Travel, Tourism Sector: कोरोना महामारी काळात भारतीय पर्यटन क्षेत्राला (Indian Tourism Sector) मोठा फटका बसला होता. मात्र आता हळूहळू या क्षेत्रात वाढ नोंदवली जात आहे. अहवालानुसार, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात 2033 पर्यंत म्हणजेच नऊ वर्षांत देशात 5.82 कोटी नोकऱ्या निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. कोरोनाच्या वेळी 2020 मध्ये पर्यटन क्षेत्रात 3.9 कोटी नोकऱ्या गेल्या, जे देशातील एकूण रोजगाराच्या सुमारे 8 टक्के होते. सोमवारी जाहीर झालेल्या एनएलबी सर्व्हिसेसच्या (NLB Services) अहवालानुसार, कोरोना साथीच्या आजारातून बरे झाल्यानंतर प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात सर्वात जलद सुधारणा झाली आहे.

कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये या क्षेत्राने 16 लाख अतिरिक्त नोकऱ्यांचे योगदान दिले. जानेवारी 2023 पासून प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील रोजंदारीच्या नोकऱ्यांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये भाषांतरकार, छायाचित्रकार आणि टूर गाईड सारख्या पदांचा समावेश आहे. पुढील दोन वर्षांत या क्षेत्रातील नोकऱ्या 20 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

आकडेवारीनुसार, परकीय चलनाचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करताना प्रवास-पर्यटन क्षेत्राने 2022 मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये 15.9 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. 2023 साठी 16.5 लाख कोटी रुपयांचा अंदाज बांधण्यात आला होता. एनएलबी सर्व्हिसेसचे सीईओ सचिन अलग यांनी सांगितले की, पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ झालेल्या शीर्ष शहरांमध्ये दिल्ली, एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि कोची यांचा समावेश आहे. इतर शहरांमध्ये जयपूर, अहमदाबाद आणि चंदीगडचा समावेश आहे.

सचिन अलग यांच्यामते, आतापर्यंत देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. तसेच येणाऱ्या काळात डेस्टिनेशन वेडिंग ट्रॅव्हल, धार्मिक पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन, साहसी क्रीडा पर्यटन, इको टुरिझम, सांस्कृतिक पर्यटन आणि ग्रामीण पर्यटन यांसारखी अनेक नवीन क्षेत्रे उदयास येत आहेत, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: भारतामध्ये वाढत आहे प्रवास करण्याचा ट्रेंड; 2023 मध्ये अयोध्येबाबतच्या सर्चमध्ये 585 टक्के वाढ, उज्जैन आणि बद्रीनाथलाही पसंती)

ज्यांची मागणी वाढणार आहे त्या प्रमुख प्रोफाईलमध्ये सेल्स (18%), बिझनेस डेव्हलपमेंट (17%), शेफ (15%), ट्रॅव्हल ॲडव्हायझर्स (15%) यांचा समावेश आहे. त्यानंतर टूर ऑपरेटर (15 टक्के), ट्रॅव्हल एजंट (15 टक्के), हॉटेलवाले (15 टक्के), मार्गदर्शक (20 टक्के), वन्यजीव तज्ञ (12 टक्के) यांनाही चांगली मागणी आहे.