IRCTC कडून महिला ट्रेन यात्रींसाठी रक्षाबंधन सणाचं गिफ्ट; Tejas Express ने प्रवास करणार्‍यांना स्पेशल कॅशबॅक ऑफर
Tejas Express (Photo Credits: ANI)

भारतामध्ये सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र महिना श्रावण सुरू आहे आणि त्याच्या ओघाने हिंदू धर्मियांच्या सणांची रेलचेल सुरू झाली आहे. यंदा 22 ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन आहे. या निमित्ताने महिला प्रवाशांना रक्षाबंधन चं औचित्य साधत आयआरसीटीसीने (IRCTC ) खास खूषखबर दिली आहे. महिला प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने खास कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 15 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार आहे.

आयआरसीटीसीच्या माहितीनुसार या काळात लखनऊ - दिल्ली आणि अहमदाबाद - मुंबई दरम्यान धावणार्‍या तेजस एक्सप्रेस (Tejas Express) च्या महिला प्रवाशांना 5% कॅशबॅक मिळणार आहे.

बहिण-भावाच्या नात्याचं आपलंपण जपणार्‍या रक्षाबंधनाचा सण यंदा 22 ऑगस्ट ला आहे. म्हणूनच या सणानिमित्त 15ते 24 ऑगस्ट दरम्यान दोन तेजस एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवास करणार्‍यांना 5% ऑफ मिळणार आहे. ही कॅशबॅक ऑफर तिकीटदरावर आणि केवळ महिला प्रवाशांसाठी लागू असेल.

दरम्यान आयआरसीटीसीने आता ऑफर लॉन्च केली असली तरीही ज्या महिला प्रवाशांनी 15 ते 24 ऑगस्ट दरम्यान यापूर्वीच तिकीट बुकिंग केले आहे त्यांना देखील या ऑफरचा फायदा मिळणार आहे. ज्या माध्यमातून तिकीट बुकिंग केले असेल तसे महिला प्रवाशांना प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अकाऊंट मध्ये कॅशबॅकची रक्कम मिळणार आहे.

आईआरसीटीसी (कडून लखनऊ ते दिल्ली (ट्रेन नंबर 82501/82502) आणि मुंबई ते अहमदाबाद (ट्रेन नंबर 82901/82902) दरम्यान तेजस एक्सप्रेस चालवल्या जातात. मागील काही महिन्यात कोरोना संकटामुळे या ट्रेन बंद होत्या पण 7 ऑगस्ट पासून पुन्हा सेवा सुरळीत करण्यात आल्या आहेत. सध्या या तेजस एक्सप्रेस शुक्रवार ते सोमवार असे चार दिवसच चालवल्या जाणार आहेत.