Ganeshotsav 2019: अष्टविनायकामधील तिसरा गणपती 'सिद्धटेकचा सिद्धिविनायक'; जाणून घ्या मंदिर, मूर्ती आणि महत्व
siddhivinayak temple (wikipedia)

महाराष्ट्रात (Maharashtra) गणशोत्सव (Ganeshotsav 2019) मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सव दरम्यान अनेक भाविक अष्टविनायाकाचे दर्शन घ्यायला जात असतात. महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठीत आणि मानाची गणपतीचे स्थान म्हणून अष्टविनायकाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणाच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या 8 मंदिरांस मिळून अष्टविनायक म्हटले जाते. या आठ मंदिरातून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात.  त्यापैकी एक सिद्धिविनायक आहे.

 

सिद्धटेकचा सिद्धिविनायक, (Siddhivinayak Temple, Siddhatek)

सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक येथील एका उंच डोंगरावर स्थित आहे. सिद्धिविनायकाची पूजा केल्यास प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात, असा भाविकांमध्ये समज आहे. माहितीनुसार, हजारो वर्षापूर्वी भगवान विष्णू यांची 2 राक्षसांसोबत युद्ध झाले होते. तब्बल 8 हजार वर्ष हे युद्ध चालू राहूनही भगवान विष्णू यांना विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर भगवान विष्णु यांनी भगवान शंकराची भेट घेतली. त्यावेळी भगवान शंकर यांनी विष्णुला सिद्धिटेक डोंगरावर जाऊन तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. भगवान विष्णू यांना त्या डोंगरावर सिद्धी प्राप्त झाली म्हणून सगळ्या देवांनी या मंदिराला सिद्धिविनायक नाव दिले. यामुळे मंदिराला सिद्धिविनायक म्हणून ओळखू लागले.

मंदिर -

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. सिद्धिविनायकाचे मंदिर दौंडपासून 19 कि. मी. अंतरावर आहे.

मूर्ती –

अष्टविनायकापैकी सिद्धिटेकचा दयाळू गणपती म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात, या श्रद्धेने लोक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. सिद्धटेक येथील गणेशाची मूर्ती 3  फुट लांब आणि अडीच फुट रुंद आहे. अष्टविनायकांपैकी सिद्धिविनायकाची मूर्ती अधिक प्रभावशाली असल्याचे बोलले जाते.

मार्ग -

अहमदनगर-कर्जत- सिद्धटेक 87 किलोमीटर

दौंड-देवळगाव-सिद्धटेक 18 किलोमीटर

मुंबई ते सिद्धटेक - 250 किलोमीटर

इतर माहिती –

संत मोर्या गोसावी यांना सिद्धिटेकच्या सिद्धिविनायकाकडून सिद्धी प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. केळगावच्या नारायण महाराजांनाही या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली होती. महत्वाचे म्हणजे, मध्ययुगीन काळात पेशव्यांनी सरदार हरी पंत फडके यांचे सेनापती पद हिरकावून घेतले होते. त्यावेळी सरदार हरी पंत फडके यांनी 21 दिवस सिद्धिविनायकाची उपासना केली होती. उपसना केल्यानंतर फडके यांना पुन्हा सेनापती पद मिळाले होते.