जोडीदारासह नातं टिकवायचे असेल तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी
Couple (Photo Credits: PixaBay)

असं म्हणतात नवरा-बायकोमधील (Husband-Wife) गोड नात्याची सुरुवात विश्वास, प्रेम, काळजी या गोष्टीने होते. पण हे ही तितकंच खरं आहे की अशा गोड नात्यात जेव्हा कडवटपणा म्हणजे भांडणं होतात तेव्हा त्याची कारणे हीच असतात पण या गोष्टी कमी झालेल्या असतात हा बदल होतो. नवरा-बायको हे नातं आयुष्यभराचे नातं असतं असं नाते जे आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांचे हात घट्ट पकडून शेवटपर्यंत अगदी कठीण प्रसंगातही एकमेकांना साथ देते. या नात्याला व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण हे नाते टिकवायचे असेल तर शब्दातून हे नातं व्यक्त होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे जोडीदाराशी जास्तीत जास्त मनमोकळेपणाने बोला. संवाद हा जोडप्यांमध्ये खूप महत्त्वाचा आहे.

पण आजकाल ऑफिसच्या कामामुळे, घरातील ताणतणावामुळे व रोजच्या धावपळीमुळे हा संवादच कुठेतरी हरवून बसलाय ज्याचा थेट परिणाम सध्याच्या जोडप्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये संवाद हा जितका महत्त्वाचे कारण आहे तसेच पुढे दिलेल्या 5 गोष्टीही महत्त्वाच्या आहेत, या गोष्टींचा जरा विचार करुन बघितलात तर तुमच्या नात्यात आलेला दुरावा हा कमी होण्यास मदत होईल.

1. समोरच्या चे ऐकण्याची क्षमता ठेवा:

आपल्या जोडीदाराचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. नेहमीच आपणच बरोबर आहोत असे वागणे टाळा. समोरच्यालाही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना नक्की काय म्हणायचे आहे त्यामागे नेमकी काय भावना आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा

2. स्वभाव ओळखायला शिका:

बहुधा बरीचशी जोडपी ही दोन भिन्न स्वभावाची असतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराचा स्वभाव ओळखायला शिका. आपल्या अपेक्षांचे ओझे त्याच्यावर लादू नका. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते जसे आहेत तसे स्विकारा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मूळ स्वभाव हा सहसा बदलत नाही. Live-In Relationship मधील कटकटीमुळे त्रस्त? लग्नाआधी एकत्र राहताना 'या' गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी

3. अविश्वास दाखवू नका:

नात्यात विश्वास हा खूप महत्त्वाचा घटक आहे. चुकूनही रागाच्या भरात त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका. कारण या गोष्टी समोरच्या मनात कायमस्वरूपी लक्षात राहतात. त्यामुळे त्यांच्यावर नेहमी विश्वास ठेवा.

4. एकमेकांना स्पेस द्या:

तुम्हाला जशी स्वत:ची स्पेस हवी असते, तशी ती समोरच्यालाही हवी असते हे विसरू नका. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी जोडीदारामागे सतत भुणभूण करु नका. त्याच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसू नका. नात्यात मोकळेपणा नसेल तर जीव घुटमळतो.

5. संवाद साधा, काळजी घ्या:

जितकं जमेल तितकं एकमेकांशी संवाद साधा. एकमेकांची विचारपूस करा. काळजी करा. संवाद हा कोणत्याही नात्यातील दुरावा कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

कामाव्यतिरिक्त जितका जास्त वेळ तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत घालवता येईल तितका घालवा. कामानिमित्त ते शक्य नसेल तर फोनवरुनही तुम्ही एकमेकांची खुशाली विचारू शकता. फक्त सतत त्याच्यामागे भुणभुण लावू नका. तुम्ही तुमच्या जोडीदाराला फोन करे यात समोरच्याला काळजी वाटली पाहिजे कंटाळवाणे नाही. नाही का!!