Pre-Wedding Shoot Spots In Mumbai: प्री वेडिंग फोटो शूट करणार आहात? मुंबईतील 'या' पाच ठिकाणांचा पर्याय ठरेल अगदी बेस्ट
Pre Wedding Photo Shoot Spots In Mumbai (Photo Credits: Instagram)

लग्नाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील खास क्षण अनुभवणारे कपल्स आपला हा आनंदसोहळा खास करण्याच्या प्रयत्नांत असतात. सोबतच हे क्षण फोटोच्या रूपात साठवून ठेवत पुढे आयुष्यभर जपून ठेवले जातात. मागील काही वर्षात लग्नासोबतच प्री वेडिंग फोटोशूटचा (Pre-Wedding Shoot) ट्रेंड सुद्धा कमालीचा प्रसिद्ध झाला आहे. लग्नाआधी एखाद्या मस्त रोमँटिक ठिकाणी जाऊन फोटो शूट करताना, वेगवेगळ्या थीम, कपडे, ट्रेंडी जागा याकडे बारकाईने लक्ष दिले जाते. साधारणतः या शूटसाठी एखादी जुनी वास्तू, समुद्र किनारा, जंगल, अशा ठिकाणांना कपल्स खास पसंती दर्शवतात. दरम्यान, आता डिसेंबर महिन्याची चाहूल लागताच सर्वत्र लग्नसराईची धामधूम पाहायला मिळत आहे. तुमच्यातीलही अनेकजण आपल्या वेडिंग आणि प्री वेडिंग साठी बेस्ट ठिकाणे शोधत असतील. तुमच्या या शोधाचे समाधान आम्ही आज सुचवणार आहोत.

तुमचंही जर का यंदा कर्तव्य असेल आणि लग्नाच्या बेडीत अडकण्याआधी तुम्ही प्री वेडिंग फोटो शूट करून या सोहळ्याची सुरुवात करू इच्छित असाल तर मुंबई व लगतच्या भागातील या ठिकाणांच्या पर्यायाचा आपण नक्की विचार करू शकता..

गेट वे ऑफ इंडिया

जर का तुम्ही मुंबईकर असाल तर गेट वे ऑफ इंडियाचे सौंदर्य काही वेगळं सांगायला नको. पुरातन वास्तू, समुद्राच्या लाटा असं समीकरण एकाच ठिकाणी जुळवून आणणारा हा स्पॉट आहे. याठिकाणी असणारा मुंबई हा बोर्ड म्हणजे फोटोसाठी बेस्ट स्पॉट आहे. याठिकाणी जाताना साधारण ५ वाजताची वेळ उत्तम ठरते जेणेकरून मावळता सूर्य आणि नैसर्गिक लाइटिंग असा बोनस माहोल फोटोसाठी तयार होतो.

फोर्ट परिसर

फोर्ट परिसरात असणाऱ्या एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्या या फोटोशूट साठी प्रसिद्ध आहेत. पांढऱ्या रंगाची भव्य वास्तू आणि त्या पायऱ्यांवर रोमँटीक पोझ देण्याचा पर्याय अनेकांना भुरळ घालतो. तसेच समोर असणारी हॉर्निमन सर्कलची बिल्डिंग व गार्डन यांचा पर्यायही आपल्याला निवडता येऊ शकता. फार दगदग न करता तुम्हाला जवळच्या जवळ शूट करायचे असेल तर फोर्ट, काला घोडा, सीएसएमटी स्थानकाची वास्तू , लागूनच नरिमन पॉईंट असा प्लॅन आखता येईल.

प्रायव्हेट जेटी (Private Jetty)

प्री वेडिंग मध्य काहीतरी भन्नाटच करायचे असेल तर हा पर्याय तुमची इच्छा पूर्ण करू शकतो. गेट वे ऑफ इंडिया वरून अलिबाग किंवा उरणच्या दिशेने जाणार्या प्रायव्हेट जेटी काही तासांसाठी बुक करून तुम्ही फोटोशूट करू शकता. तुमच्या पार्टनरसोबत रोमँटिक वेळ घालवण्यासाठी (तुम्हाला अगदी बेसिक टायटॅनिक पोझ द्यायचे असल्यास) हा पर्याय उत्तम आहे

भंडारदरा डॅम

एखादा वीकएंड आऊट प्लॅन करून तुम्ही पार्टनर सोबत लग्नाआधी बाहेर जाऊ शकणार असाल तर भंडारदरा धरण हा परिसर अतिशय सुंदर पर्याय आहे.

वसई फोर्ट

मुंबईपासून काहीच अंतरावर शांत आणि रम्य वातावरण असणारा वसई फोर्ट अधिक गजबज नसलेला पर्याय आहे. ऐतिहासिक टच असणारी वास्तू आणि हिरवळ यामध्ये तुमचा रोमँटिक क्षण टिपता येऊ शकतो.

तर, प्री वेडिंग शूट करण्याचा उद्देश हा केवळ फोटो काढणे नसून तुमच्या पार्टनर सोबत काही क्षण घालवणे हा असतो. लग्नाच्या घाई गडबडीत मानपान, नातेवाईक यामध्ये आपला वेळ जातो त्यामुळे आपल्याच खास दिवशी आपल्याच पार्टनरला नीट पाहायला सुद्धा वेळ मिळत नाही. यामुळेच लग्नाच्या आधी या शूट च्या निमित्ताने तुम्हाला काही सुंदर क्षण आपल्या आठवणीत ऍड करता येऊ शकतात.