जगभरामध्ये 7 एप्रिल दिवशी World Health Day साजरा केला जातो. WHO सह आरोग्य संस्थांशी निगडीत अन्य काही संस्था आणि यंत्रणांच्या मदतीने या दिवशी मानवी आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. प्रत्येक वर्षी या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विशेष थीम ठरवली जाते आणि त्याभोवती या वर्षातून एकदा साजरा केल्या जाणार्या आरोग्य दिनाचं सेलिब्रेशन असतं. यावर्षी जागतिक आरोग्य दिनी 'Building a fairer, healthier world'या थीम वर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. सध्या जगभरात कोविड 19 अजूनही थैमान घालत आहे. या जागतिक आरोग्य संकटामधून पुन्हा अनेक प्रश्न समोर ठाकले आहेत. आज 21 व्या शतकामधेही औषधोपचार समाजातील प्रत्येक घटकाच्या आवाक्यात नाहीत, विविध स्तरांमध्ये त्यात भेदभाव केले जातात. आरोग्य यंत्रणा मर्यादित असून आरोग्य कर्मचार्यांवरही त्याचा मोठ्या प्रमाणात दबाव आहे. मग यंदाच्या जागतिक आरोग्य दिनी जाणून घ्या वर्ल्ड हेल्थ डे ची तारीख, थीम, महत्त्व.
7 एप्रिलला संयुक्त राष्ट्रामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक देशामध्ये जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. 1950 साली पहिल्यांदा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला होता. 7 एप्रिल दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची निर्मिती झाल्याने या दिवसाचं औचित्य साधत 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी या जागतिक सेलिब्रेशनचं 71 वे वर्ष आहे. Happy World Health Day 2021 Wishes: जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत करा दीर्घायुरारोग्य साठी प्रार्थना.
जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?
मानवी आरोग्याच्या दृष्टीने त्याविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात. शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष असणं गरजेचे आहे त्यामुळे जागतिक आरोग्य दिनाचे विशेष महत्त्व आहे. WHO देखील जागतिक स्तरावर भेडसावणार्या आरोग्य विषयक समस्यांना या दिवसाचं औचित्य साधत काही उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो.
मागील वर्षभरापासून भारतासह जगभरात कोविड 19 चं संकट थैमान घालत असल्याने प्रत्येकालाच आरोग्य विषयक जागृत राहण्याचं महत्त्व पटलं असेल. विकसित देश आणि महासत्ता देखील या जागतिक आरोग्य संकटासमोर हतबल झाल्याने या क्षेत्राला अजून किती विकसित करण्याची गरज आहे? हे देखील अनेकांना समजले असेल.
दरम्यान यंदाचा जागतिक आरोग्य दिन तुमच्यासाठी खूप सार्या नव्या संधी, दीर्घायुष्य आणि आनंद घेऊन येवो हीच लेटेस्टली कडून शुभेच्छा!