COVID-19 Vaccine: धुम्रपानाच्या सवयीमुळे कोरोना लसीचा प्रभाव होणार कमी? जाणून घ्या सविस्तर
COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

COVID-19 Vaccine and Smoking:  कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत (Coronavirus Second Wave) देशातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मृतांचा आकडाही काही प्रमाणात वाढलेला दिसत आहे. या संपूर्ण परिस्थितीत सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आणि कोविड19 लस (Covid19 Vaccine) घेऊ स्वत:ला सुरक्षित करणे हाच संरक्षणाचा मार्ग आहे. दरम्यान, 16 जानेवारीपासून लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. तसंच आजपासून 18-44 वयोगटातील नागरिकांची लसीकरण प्रक्रीया सुरु झाली आहे. मात्र लसींच्या मर्यादीत उपलब्धतेमुळे लसीकरणाला वेग आलेला नाही. त्यातच लसींसंबंधित विविध प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. कोविड19 लस घेतल्यानंतर धुम्रपान (Smoking) करणे योग्य आहे? धुम्रपानामुळे कोरोना लसीचा प्रभाव कमी होतो? जाणून घेऊया यासंबंधित महत्त्वपूर्ण बाबी:

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, धूम्रपान करणार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत संसर्गापासून बचाव करण्यासाठी शक्य तितक्या लवकर लसीकरण करणे महत्वाचे आहे. इतकेच नाही तर धूम्रपान केल्याने फुफ्फुसांची क्षमता कमी होते आणि श्वसनसंबंधित आजाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोरोनाची लागण झाल्यास त्याचा गंभीर परिणाम धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीवर होण्याची संभावना अधिक असते.

कोरोना विषाणूच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर धूम्रपान करू नये असा सल्ला न्यूट्रिशनिस्ट डॉ. विशाखा यांनी दिला होता. कारण यामुळे अँटीबॉडीची प्रक्रीया कमी होईल. धूम्रपान करणारे आवश्यक असल्यास निकोटिन पॅच किंवा गमचा वापर करु शकतात. परंतु धूम्रपान करणे टाळले पाहिजे. (COVID 19 In India: शाकाहारी, धुम्रपान करणार्‍यांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कमी याचा थेट संबंध नसल्याचं CSIR चं स्पष्टीकरण)

डॉक्टरांनी इंस्टाग्रामवर पोस्टची एक सिरीज शेअर केली आहे. त्यात त्यांनी या सर्व महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. तसंच कोरोना लस घेतलेल्यांनी कोणत्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे, याचाही उल्लेख केला आहे.