First Aid Box मध्ये नेमके काय काय असावे ?
फर्स्ट एड बॉक्स (Photo Credit : Pixabay)

धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या उद्भवत असतात. त्याचबरोबर घरात लहान मुलं असतील तर खेळाताना पडणे, जखम होणे अगदी स्वाभाविक आहे. तसंच कधी अचानक ताप, सर्दी यांसारख्या समस्या उद्भवतात. मोठ्यांचेही दुखणे अचानक डोके वर काढते. अशा वेळी घरातील फर्स्ट एड बॉक्स मदतीला सज्ज असतो.

फर्स्ट एड बॉक्स का गरजेचा आहे ?

ताप येणं, इंफेक्शन, कापणं, जखम होणं यांसारख्या लहान सहान तक्रारी प्रत्येक घरात असतात. त्यामुळेच विशेषतः ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्या घरात फर्स्ट एड बॉक्स असणे खूप गरजेचे आहे. अचानक ताप आल्यास किंवा जखम झाल्यास डॉक्टर उपलब्ध नसतील तर हा बॉक्स खूप उपयुक्त ठरतो.

फर्स्ट एड बॉक्समध्ये काय काय असावे?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅंडेड. त्यानंतर जखमेवर लावण्यासाठी कॉटनची जाळीदार पट्टी, कॉटन, अॅंटीसेप्टीक लिक्वीड या गोष्टी असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर अॅंटीसेप्टीक क्रिम किंव लोशन फर्स्ट एड बॉक्समध्ये असावा. तसंच फर्स्ट एड बॉक्स थर्मामीटरशिवाय अपूर्ण आहे.

पेनकिलर

स्नायू दुखावले असल्यास, पायदुखी, कंबरदुखी यांसारखी दुखणी केव्हाही उद्भवू शकतात. अशावेळी झटपट आराम मिळवण्यासाठी पेनकिलर कामी येते. म्हणूनच फर्स्ट एड बॉक्समध्ये क्रोसीन, कॉम्बीफ्लेम, पॅरासिटामॉल यांसारख्या गोळ्या अवश्य ठेवा. मात्र वारंवार पेनकिलर्स घेणे योग्य ठरणार नाही. सततच्या दुखण्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

फंगल मेडीसन

ऊन, घाम, धूळ किंवा ओलाव्यामुळे फंगल इंफेक्शन होऊ शकतं. असा वेळी फर्स्ट एड बॉक्समध्ये असलेली अँटीफंगल क्रिम, गोळ्या किंवा पावडर उपयुक्त ठरते. मात्र याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.

मसल्स क्रिम आणि स्प्रे

मुकामार लागल्यास किंवा आतून स्यानू दुखावला असेल तर त्यावर मसल्स क्रिम किंवा स्प्रे चा वापर तुम्ही करु शकता. त्याचबरोबर हिटींग पॅडने देखील आराम मिळेल.