
खाण्याच्या अनियमित वेळा, जंक फूडचा आहारात समावेश, योग्य तो आहार न घेणे यांसारख्या गोष्टींमुळे आजकाल सर्वांमध्ये दिसून येणारी समस्या म्हणजे अॅसिडीटी. अॅसिडीटीमुळे (Acidity) पोट फुगणे अथवा बद्धकोष्ठता झाल्याने तुमचे पोट साफ होत नाही. त्यामुळे तुम्हाला खूप अस्वस्थ वाटते, मळमळल्यासारखे होते. त्यामुळे आपण आपल्या कामावरही लक्ष केंद्रित करु शकत नाही. या सर्व आजारांवर सर्वात रामबाण उपाय म्हणजे नियमित व्यायाम अथवा योगा करणे. मात्र घड्याळ्याच्या काट्यावर चालणा-या युगात सर्वांनाच हे करणे शक्य होते नाही. अशा वेळी काय बरे करता येईल असा विचार तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल.
म्हणूनच आज आम्ही असे 5 घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याने तुमची अॅसिडीटी ही समस्या मूळापासून नष्ट होईल. चला तर पाहूयात कोणते आहेत हे उपाय:
1. नियमित सकाळचा नाश्ता करणे
अनेकदा वेळेअभावी किंवा आपली रेल्वे, बस चुकू नये म्हणून बरेच जण सकाळचा नाश्ता योग्यरित्या करु शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ब-याचदा अॅसिडीटा सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. म्हणून अॅसिडीटी होऊ नये म्हणून सर्वात आधी आणि महत्त्वाचे म्हणजे सकाळचा नाश्ता व्यवस्थित करणे. यामुळे वेळेआधी तुम्हाला भूक लागत नाही.
2. शारीरिक हालचाल
अनेकदा कमी मेहनत केल्याने अथवा एखाद्या जागी बसून राहिल्याने आपल्याला अॅसिडीटीची समस्या निर्माण होते. त्यासाठी तुम्हाला नियमित पणे थोडा वेळ चालण्याची सवय केली पाहिजे. त्याशिवाय व्यायाम आणि योगासन करणे हे देखील तुमच्या शरीराची हालचाल करण्यास मदत करु शकतात. जेणेकरुन तुमची अॅसिडीटीची समस्या देखील दूर होऊ शकते.
3. फायबर आणि पोटॅशिअमयुक्त आहार
तुमच्या रोजच्या आहारात फायबर आणि पोटॅशिअयुक्त आहाराचा समावेश असला पाहिजे. ज्यात बीट, पालक, बटाटा, संत्रे, केळी आणि अॅवोकाडो यांचा समावेश असला पाहिजे.
4. भरपूर पाणी प्या
पाणी हा सर्व आजारांवरा विशेषत: अॅसिडीटी दूर करण्यावर सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे.
5. गरम पाण्याने आंघोळ करणे
अॅसिडीटी झाल्यास पोटाची चांगली मालिश करणे गरजेचे आहे. पोटाची चांगली मालिश पोटातील गॅस बाहेर पडतो. तसेच त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे. याने तुम्हाला खूप समाधानकारक वाटेल.
हेही वाचा- झटपट अॅसिडीटी दूर करतील स्वयंपाकघरातील हे '५' पदार्थ !
तसेच रात्री जेवल्यानंतर ताबडतोब झोपणे हे देखील अॅसिडीटी होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. म्हणून जेवल्यानंतर कमीत कमी 2 तास तरी चालणे गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. हे उपाय केल्याने अॅसिडीटीची समस्या कायमची दूर होईल.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)