आपले उत्तम आरोग्य हे आपण काय खातो यावर अवलंबून असते. विशेषत: स्वयंपाक करताना नक्की कोणत्या घटकांचा आपण वापर करतो यावर आपले आरोग्य अवलंबून असते. आरोग्यदायी खाणे नेहमीच फायदेशीर ठरते, हे आपल्याला रोगांपासून दूर ठेवते, आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर असाच एक आरोग्यदायी अन्न घटक म्हणजे कलौंजी (Kalonji). कलौंजीला इंग्रजी मध्ये Nigella Seeds म्हणतात, तर काही ठिकाणी याला काळे बी म्हणूनही यांना ओळखले जाते. तर आज आपण या कलौंजीच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
शतकानुशतके, कलौंजी एक मसाल्याचा पदार्थ आणि औषध म्हणून आशिया, उत्तर आफ्रिका आणि अरब देशांमध्ये वापरली जात आहे. आयुर्वेद आणि जुन्या ख्रिश्चन ग्रंथातही त्याचे वर्णन केले आहे. फार पूर्वीपासून स्त्रिया कलौंजीचे तेल सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरत आल्या आहेत. इजिप्तची सुंदर, रहस्यमय आणि वादग्रस्त राणी क्लियोपात्रादेखील कलौंजीच्या तेलापासून बनवलेली प्रसाधने वापरत असे.
वजन कमी करणे – अन्नात फक्त एक चमचा कलौंजी समाविष्ट केल्यास अन्नाचे पौष्टिक मूल्य खूप वाढू शकते. कलौंजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने हे शरीरावरील चरबी कमी करण्यास मदत करते.
कोलेस्टेरॉल कमी करते- 1916 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कलौंजी खराब 'एलडीएल' कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यासोबतच ते चांगले 'एचडीएल' कोलेस्ट्रॉल देखील वाढवते.
स्मरणशक्ती - कलौंजी रोज खाल्ल्याने मेंदूची शक्ती वाढते आणि स्मरणशक्ती तल्लख होते. लहानपणापासूनच मुलांच्या आहारात याचा समावेश असावा. मात्र हे गर्भधारणेदरम्यान खाऊ नये, गर्भधारणेत त्याचे सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो.
केस व त्वचा - कलौंजीमध्ये उपलब्ध अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म केसांची मुळे मजबूत बनवतात आणि त्यांची गळती थांबवातात. यामुळे केसांची वाढ उत्तम होते. तसेच त्वचा स्वच्छ, मुलायम आणि चमकदार बनविण्यातही कलौंजीची मदत होते. याचा उपयोग केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. (हेही वाचा: कोरोना व्हायरस आणि Lockdown काळात प्रवास करताना काय काळजी घ्याल?)
पोटदुखी - पोटात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी कलौंजीचे तेल महत्वाची भूमिका निभावते. पोटाच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी, अर्धा चमचे कलौंजी तेल, काळे मीठ आणि अर्धा ग्लास कोमट पाणी घेतल्यास पोटदुखीचा त्रास बराच कमी होतो.
यासह रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, संधिवात, मधुमेह, डोळ्यांची दृष्टी अशा अनेक गोष्टींसाठी कलौंजी हा रामबाण उपाय आहे.