Newspapers and Health Risks (संग्रहित संपादित प्रतिमा)

तुम्हीही जर खाद्यपदार्थ साठवण्यासाठी किंवा पॅक करण्यासाठी वर्तमानपत्र (Newspapers) वापरत असाल तर सावध व्हा. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने खाद्यपदार्थ विक्रेते तसेच ग्राहकांना आरोग्य धोक्यांचा हवाला देत, खाद्यपदार्थांचे पॅकिंग, ते सर्व्ह करणे किंवा साठवणे यासाठी वर्तमानपत्रांचा वापर करणे त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. एफएसएसएआयचे सीईओ जी कमलावर्धन राव यांनी खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी किंवा पॅकेजिंगसाठी वृत्तपत्राच्या वापरावर चिंता व्यक्त केली आणि असे केल्यामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांकडेही लक्ष वेधले.

भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत भारत देशामध्ये विकणाऱ्या सर्व खाद्यपदार्थाचे तपासणी तसेच सुरक्षितता केली जाते. तसेच खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवण, विक्री, वितरण करताना काय खबरदारी घेतली पाहिजे याचे नियमावली ठरवण्याच काम ही संस्था करत असते.

एफएसएसएआयने बुधवारी चेतावणी दिली की, वर्तमानपत्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या शाईमध्ये आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारे विविध बायोएक्टिव्ह पदार्थ असतात, जे अन्न दूषित करू शकतात आणि आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. याव्यतिरिक्त, छपाईच्या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंसह रसायने असू शकतात, जी अन्नामध्ये शिरून कालांतराने गंभीर आरोग्य धोके निर्माण होतात.

एफएसएसएआयने पुढे म्हटले की, ‘याशिवाय वर्तमानपत्र वितरणादरम्यान ते अनेकदा विविध पर्यावरणीय परिस्थितींशी संपर्क साधतात, ज्यामुळे ते बॅक्टेरिया, विषाणू किंवा इतर रोगजनकांमुळे दूषित होऊ शकतात. अशा गोष्टी अन्नात हस्तांतरित होऊ शकतात. ज्यामुळे संभाव्य अन्नजन्य आजार उद्भवू शकतात.’ (हेही वाचा: Disease X: येऊ शकते कोरोनापेक्षा 7 पट जास्त धोकादायक महामारी; 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती)

एफएसएसएआयने अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम, 2018 अधिसूचित केले आहेत, जे अन्न साठवण्यासाठी आणि गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्रे किंवा तत्सम सामग्री वापरण्यास कठोरपणे प्रतिबंधित करते. या नियमानुसार, वर्तमानपत्रांचा वापर अन्न साठवण्यासाठी, झाकण्यासाठी, सर्व्ह करण्यासाठी किंवा तळलेल्या अन्नातील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी करू नये.