प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women's Day), मुंबई (Mumbai) शहरातील योग शिक्षक आणि उत्साही लोकांनी एकत्र येऊन सोमवार, 7 मार्च रोजी मुंबईकरांना चक्क लोकलमध्ये योगाचा (Yoga) क्रॅश कोर्स दिला. सलग पाचव्या वर्षी, हील-स्टेशनने (एक योग शिकण्याचे प्लॅटफॉर्म) पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने, 'प्रवासाची वेळ फिटनेसची वेळ’ या अनोख्या थीमसह हा दिवस साजरा केला. यावेळी  'अब से होगा ट्रेन में योगा’ अशा घोषणा देण्यात आल्या. 25 ते 30 योग शिक्षकांचा एक गट मुंबईच्या बोरिवली येथून सकाळी 9 वाजता कार्यालयात आणि महाविद्यालयात जाणाऱ्या लोकांना योगाचे तंत्र शिकवण्यासाठी ट्रेनमध्ये चढला होता.

यावेळी कोविड प्रोटोकॉलचे पालन करत लोकांना योगाचे धडे देण्यात आले. बोरिवलीपासून सुरुवात करून मुंबई सेंट्रलला पोहोचेपर्यंत, वेस्टर्न लाईनवरील प्रत्येक स्टेशनवर उतरून एकतर डबे बदलून किंवा ट्रेन बदलून या लोकांनी जनतेला योगासंबंधी माहिती दिली आणि आसने करवली. रुचिता शाह या हील-स्टेशनच्या संस्थापक असून त्या योग प्रशिक्षक/आयोजक आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्या याचा भाग आहेत. 'गाड्यांमधील योग' बद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘अशी काही योगासने आहेत जी गर्दीच्या ट्रेनमध्येही करता येतात आणि लोकांनी ती आमच्यासोबत केली.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘मी 2017 मध्ये केम्प्स कॉर्नरला जायचे जिथे मी योगा शिकले आणि सराव केला. तेव्हापासून मी दररोज ते करत आहे. दिवसातील 15-20 मिनिटे आपल्या व्यस्त मनाला शांत करण्यासाठी आपण हे करू शकतो. मला शहरातील लोकांना थोडा आराम द्यायचा होता. लोकांना आम्ही जी योगासने दाखवली ती त्यांनी संकोच न करता केली. आम्ही त्यांच्या प्रवासाच्या वेळेचा फिटनेससाठी वापर करण्याचा विचार केला.’ (हेही वाचा: मुंबई मेट्रो ने वाढवल्या फेर्‍यांच्या वेळा; आता सकाळी पहिली फेरी 6.30 वाजता)

पश्चिम रेल्वे, मुंबईतील योग शिक्षक/प्रशिक्षक मिळून गेल्या 5 वर्षांपासून अशा प्रकारचे उपक्रम करत आहेत. मुंबईकरांचा थकवणारा ट्रेनचा प्रवास निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे.