दही भात (Photo Credits: suenosouvenir)

दिवसेंदिवस धकाधकीचं बनत चाललेलं जीवन पाहता अनेकांना वेळेत आणि पोषक पदार्थ खायलाही वेळ नसतो. पोषक आहाराच्या अभावी अनेक आजारांचा धोका वाढतो. मग झटपट बनणार्‍या इन्स्टंट फूडसशी मदत घेतली जाते. अशा पदार्थांमुळे जीभेचे चोचले पुरवले जातात मात्र आरोग्याला पुरेसे पोषक घटक मिळत नाही.

जेवण बनवायला कंटाळा आलाय पण तरीही झटपट, पोटभरीचा एक पदार्थ म्हणजे दही भात. गरमागरम भात आणि दही कालवून खाणं म्हणजे अहाहा ! मग पहा दही भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

लठ्ठपणा कमी होतो

भात खाण्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. मात्र दही भात हे कॉम्बिनेशन वजन घटवण्यास मदत करते. वेट लॉसच्या मिशनवर असाल तर आहारात नियमित दही भाताचा समावेश करा.

बिघडलेलं पोट

पोट बिघडलं असेल तर दही भात खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. डायरिया, पित्त यांचा त्रास कमी करण्यासाठी दही भात फायदेशीर ठरते. दही भात पचायला हलका असल्याने भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते.

तापानंतर बिघडलेली तोंडाची चव

तापामध्ये तोंडाची चव बिघडते. भूक लागली तरीही पुढील काही दिवस खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळेस शरीरात उर्जा टिकून राहण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी दही भात खाणं फायदेशीर आहे.

बद्धकोष्ठतेपासून आराम

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी दही भात हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये चांगले बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात असतात. दही पचनसंस्थेचं कार्य सुरळीत करण्यास मदत करतात. पोटदुखीचा त्रास कमी करण्यासही मदत होते. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात नियमित दही भाताचा समावेश करा.

ताण-तणाव कमी करा

ताण तणाव हा आपल्या जीवनाचा एक भागच बनला आहे. मात्र हा त्रास कमी करायचा असेल तर आहारात दही भाताचा समावेश करावा. दह्यातील प्रोबायोटीक घटक, अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक, उत्तम प्रतीचे फॅट्स तुमचा मूड सांभाळण्यास मदत करतात. यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते.