Eggs (Photo Credits-Twitter)

‘अंडे’ (Egg) हे सहज उपलब्ध होणारे सर्वाधिक पोषणयुक्त खाद्यपदार्थांपैकी एक मानले जातात. ते प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या चरबीयुक्त असल्यामुळे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासह अंडी स्नायू वाढवणे, मेंदूचे आरोग्य राखणे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. आता शास्त्रज्ञांचेही म्हणणे आहे की, नियमितपणे अंडी खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. ते तुमचे आयुष्य देखील वाढवू शकते. अभ्यासानुसार, अंडी सायलेंट किलर आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 29% कमी करू शकतात. अंड्यांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासामध्ये ही गोष्ट समोर आली आहे.

जाणून घ्या काय सांगतो अभ्यास-

जर तुम्ही निरोगी प्रौढ असाल, तर आठवड्यातून सहा अंडी खाल्ल्याने हृदयरोग (CVD) मुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त, जे नियमितपणे अंडी खातात त्यांना कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका 15% कमी होता. तर महिन्यातून फक्त एकदा किंवा दोनदा अंडी खाणाऱ्यांना जास्त धोका असतो. मेलबर्नमधील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. यूकेमध्ये अंदाजे 7.6 दशलक्ष लोक हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारांमुळे रक्तवाहिन्या अरुंद किंवा ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, अँजायना किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

हा अभ्यास 'न्यूट्रिएंट्स' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 8,756 सहभागींचा समावेश होता ज्यांनी स्वतः अंडी खाल्ल्याची नोंद केली. या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका हॉली वाइल्ड म्हणाल्या की, अंडी पोषक तत्वांनी समृद्ध असतात. ते प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहेत आणि त्यात बी-जीवनसत्त्वे, फोलेट, जीवनसत्त्वे (ई, डी, ए, के), कोलीन, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स आणि इतर अनेक खनिजे असतात. (हेही वाचा: Midday Meal Scheme: आता सरकारी शाळांच्या माध्यान्ह भोजन कार्यक्रमात मुलांना मिळणार नाही अंडी आणि साखर; महाराष्ट्र सरकारने थांबवला निधी)

अभ्यासाची पद्धत-

सहभागींना त्यांच्या अंडी खाण्याच्या सवयींनुसार 3 गटांमध्ये विभागण्यात आले होते.

-कधीही अंडी खात नाही किंवा फार क्वचितच (महिन्यातून 1-2 वेळा)

-आठवड्यातून 1-6 वेळा

- दररोज किंवा दिवसातून अनेक वेळा

या संशोधनात असे आढळून आले की, ज्या लोकांनी अंडी खाल्ली, विशेषतः ज्यांनी संतुलित आहार घेतला, त्यांना हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका 33% ते 44% कमी होता.

अंड्यांचे सेवन-

ऑस्ट्रेलियन आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) नुसार, सामान्य कोलेस्ट्रॉल पातळी असलेले प्रौढ आठवड्यातून सात अंडी खाऊ शकतात . युरोपमधील काही ठिकाणी, आठवड्यातून तीन ते चार अंडी खाण्याची मर्यादा घालण्याची शिफारस केली जाते. उकडलेले किंवा ऑम्लेट स्वरूपात खाणे सर्वात आरोग्यदायी आहे. कच्चे अंडे टाळा, कारण त्यात जीवाणू असण्याची शक्यता असते. पूर्वी असे मानले जात होते की, जास्त अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयरोगाचा धोका वाढतो, परंतु ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, ही धारणा आता बदलत आहे. हा एक मोठा गैरसमज असल्याचे समोर आले आहे.