‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ स्थापन करण्यासाठी व सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आवश्यक असलेला रु.२१०.०१ कोटी रुपये निधी आगामी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व महानगरपालिका रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जाते.
राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत बनविण्यासाठी सातत्यपूर्ण आरोग्य, गुणवत्तापूर्ण सेवा तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करुन राज्याचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याचे शासनाचे धोरण आहे. अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागात व झोपडपट्टी क्षेत्रात दवाखाने स्थापन करुन आरोग्य सेवा देण्याचे प्रयोग सुरु करण्यात आलेले आहेत. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने सन २०२२-२३ मध्ये “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्राची स्थापना केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यामध्ये एकूण ७०० ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली. त्यानुसार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर आरोग्य केंद्रासाठी औषधे, चाचण्या, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ५०० चौरस फूट जागा, फर्निचर, स्वच्छता व सुरक्षा उपलब्ध करुन देणे, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, सफाई कर्मचारी व अटेंडंट एवढा कर्मचारी वर्ग, ३० प्रकारच्या चाचण्या, १०५ प्रकारच्या औषधी, ६६ प्रकारची वैद्यकीय उपकरणे, फर्निचर व वैद्यकीय साहित्य सामग्री, सॉप्टवेअर, हार्डवेअर उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
आपला दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना नवीन असल्यामुळे त्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना ५ वर्षासाठी कार्यरत राहणार असल्याने या योजनेसाठी द्यावयाची प्रशासकीय मान्यता ५ वर्षासाठी देण्यात आली आहे. ‘आपला दवाखाना’ या योजनेचे कार्यक्षेत्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटकमंडळे इ. ठिकाणी साधारणत: १५००० लोकसंख्यामागे एक याप्रमाणे दवाखान्यांची निर्मिती करण्यात येईल. (हेही वाचा: Guillain-Barre syndrome, दुर्मिळ न्युरोलॉजिकल सिंड्रोम मुळे Peru ,मध्ये Health Emergency; जाणून घ्या लक्षणं काय?)
आपला दवाखाना आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची निवड १५व्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निधीच्या विनियोगाबाबत नियोजन व संनियंत्रण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडून करणार आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेत आरोग्य सेवा लाभार्थ्यांना मोफत पुरविण्यात येईल. जिल्हा आरोग्य सोसायटीने भाड्याने जागा घ्यावी, त्यामध्ये आवश्यक बदल करावेत, सोयीसुविधा पुरवाव्यात, यंत्रसामुग्री, औषधे व डॉक्टरसहीत इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा. सदर ५०० चौरस फूट भाड्याची जागा “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” साठी उपलब्ध करावी. दवाखान्यामध्ये औषधी वितरण मोफत पुरविण्यात येईल. प्रत्येक दवाखान्यामध्ये एकूण ३० प्रकारच्या चाचण्या करणे आवश्यक राहील. आपला दवाखान्यामध्ये एकूण १०५ प्रकारच्या औषधी असतील.