केस गळणे कमी करण्यास मदत करतील हे 5 हेल्दी ज्यूस
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

बदलत्या वातावरणामुळे आणि आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे आजकाल महिलांमध्ये केस गळण्याच्या (Hair Fall) समस्या पाहायला मिळतात. अगदी मुलींपासून ते स्त्रियांपर्यंत प्रत्येकालाच केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच प्रदूषणामुळे केस गळतीची समस्या महिला आणि मुलींमध्ये जास्त पाहायला मिळतेय. केस गळतीच्या या समस्येला पासून सुटका करून घेण्यासाठी मुलींप्रमाणे महिलाही वाट्टेल तेवढे शॅम्पू, कंडिशनर, तेल लावतात. मात्र इतके सगळे उपदव्याप करुन हवा तसा रिझल्ट न मिळाल्याने आणि याउलट केमिकलयुक्त उत्पादन वापरल्यामुळे अजून केस गळती वाढते आणि तमाम महिला वर्गाचा हिरमोड होतो.

तसे केस गळतीवर बरेच घरगुती उपायही आहेत, मात्र ते करण्यासाठी पुरेसा वेळ प्रत्येक महिलेकडे असतो असे नाही. अशा वेळी तुम्ही खाली दिलेले 5 ज्यूस पिऊ शकता. हे ज्यूस रोज प्यायल्याने तुमची केस गळतीची समस्या कमी होऊ शकते.

1. कोरफड

कोरफडच्या रसात व्हिटॅमिन सी, ई आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या ज्यूसचे सेवन केल्याने केस गळणे कमी होण्यास मदत होऊ शकते आणि केसांची मूळे मजबूत होतात. कोरफडीचा ज्यूस बनविण्यासाठी ताज्या कोरफडीमधला गर वेगळा करणे. त्याला मध आणि लिंबाचा रस मिसळून त्यात ब्लेंडर फिरवून त्याचा ज्यूस बनवणे. याचे नियमित सेवन केल्याने केसांसोबत तुमच्या चेह-यावरही ग्लो येतो.

2. गाजर

जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून हैराण झाले आहात, तर तुम्हाला रोज गाजराचा ज्यूस पिणे सुरु केले पाहिजे. गाजराच्या ज्यूसमध्ये बीटा कॅरोटिन असते, जे तुमच्या केसांना मजबूत बनवून त्यावर चमक आणतो. त्याचबरोबर गाजरातील व्हिटॅमिन सी मुळे तुमच्या डोक्यात चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह होण्यास मदत होते.

3. पेरू

पेरूचा ज्यूससुद्धा केस गळतीच्या समस्येवर फायदेशीर आहे. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक अॅसिड आणि अँटी-ऑक्सीडेंट सारखे घटक आहेत जे तुमच्या केसांना मजबूती देतात. पेरूचा ज्यूस हा नाश्ता केल्यानंतर केला पाहिजे. ज्याने तुमच्या केसाला त्याचा फायदा होईल.

4. किवी

केस तुटणे, गळण्याच्या समस्येवर किवी खूपच गुणकारी आहे. किवीमधील व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम केसांच्या समस्येला मजबूत बनवतात आणि केस गळण्याचे कमी करतात. रोज नाश्त्यानंतर किवीचा ज्यूस प्यायल्याने तुमचे केस लांबसडकही होऊ शकतात.

हेही वाचा- तुमचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी मदत करेल गोड 'बडीशेप', वाचा गुणकारी फायदे

5. कोथिंबीर

कोथिंबीरचा ज्यूस प्यायल्याने तुमची केसगळतीच्या समस्या काही अंशी कमी होऊ शकते. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयर्न, फायबर आणि व्हिटॅमिन असते. कोथिंबीरीच्या पानांसोबत टोमॅटो आणि 1 आवळा मिक्स करुन त्याचा ज्यूस बनवावा. हा ज्यूस केसगळतीवर खूप फायदेशीर आणि उपयुक्त असा उपाय आहे.

या ज्यूस नियमित प्यायल्यास न केवळ तुमची केस गळतीची समस्या कमी होईल तर तुमच्या त्वचेवर, चेह-यावरही वेगळा ग्लो येईल. तुमची त्वचा चमकदार होईल.

(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)