आज मध्यरात्री जेजुरीच्या कडेपठारावर साजरा होणार खंडोबा देवाचा  ‘गणपुजा उत्सव’; भंडाऱ्याची उधळण आणि छबिन्याने गाजणार रात्र
खंडोबा (फोटो सौजन्य-फेसबुक)

जेजुरी... महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील कित्येकांचा जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत आहे. वर्षभर जेजुरीगडावर आणि कडेपठारावर अनेक सण-उत्सव साजरे होतात. आज आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर मध्यरात्री (3 जुलै) कडेपठार मंदिरात खंडोबा देवाचा ‘गणपुजा उत्सव’ (Gan Puja Festival) मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे. या वेळी महापूजा, छबिना, भंडाऱ्याची शेजपूजा, प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. गडावर पावसाचे वातावरण असूनही या पूजेसाठी अनेक भक्त गडावर दाखल झाले आहेत.

आषाढ शुद्ध प्रतिपदेला मणि मल्ल राक्षसावर विजय मिळवून भगवान शंकर मार्तंड भैरव अवतार घेऊन कडेपठारावर अवतरले होते. या दिवशी सर्व देव गनांनी त्यांची भंडाऱ्याने पूजा केली तोच हा उत्सव गणपूजा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मंदिरातील लिंगावर रात्री माना पूजा घडतात. त्यानंतर लिंगावर भंडारा वाहिला जातो. गावकरी, मानकरी, भाविक आपापल्या इच्छेनुसार भंडारा वाहतात. रात्री मंदिरातून देवाचा वाजत गाजत, वाघ्या मुरळीसह छबिना निघून गडाला प्रदक्षिणा घातली जाते. हा छबिन्याचा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालतो.

सकाळी देवाच्या गर्भ गृहातील भंडारा भाविकांना वाटण्यात येतो. त्यानंतर प्रसाद वाटप होऊन या उत्सवाची सांगता होते. यावेळी देवाचे मानकरी, पूजारी, सेवक वर्ग, रामोशी समाज बांधव, ग्रासस्थ, भक्त असे हजारोंच्या घरात भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.