Diwali 2019 Faral Ideas: पनीर करंजी ते सँडविच शंकरपाळी सह यंदाचा दिवाळी फराळ करा खास; पहा झटपट रेसिपीज
Diwali Faral Ideas (Photo Credits: Youtube)

दिवाळीचा (Diwali 2019)  सण म्हंटला की जवळपास महिन्याभरापासूनच घरोघरी लज्जतदार फराळ (Faral) बनवण्यास सुरुवात होते. पण यंदा लाडू (Ladu), चकली (Chakali), करंजी (Karanji)  या पदार्थांना थोडा हटके ट्विस्ट देऊन काहीश्या फ्युजन रूपात सादर केले तर तुम्हालाही आवडेल ना? यासाठी तुम्हाला काही वेगळी मेहनत घ्यायची नाहीये तर उलट तुमचे काम कमी करून अगदी आयत्या वेळेला बनवता येतील असे काही पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. चला तर मग .. तुमच्यातील सुप्त शेफला जागे करा आणि कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार व पाहुण्यांना तुमच्या हातून बनवलेला हटके फराळ खाऊ घाला.. पहा या काही झटपट रेसिपीज

पनीर करंजी

दरवर्षीच घरोघरी गूळ, खोबरे आणि डाळीच्या पिठाचे सारण टाकून कारंजी बनवली जाते, यंदा मात्र आपण  पनीर टाकून एक नवीन पाककृती बनवणार आहोत. यासाठी पनीरचे तुकडे करून वा किसून गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यावे, यामध्ये ड्रायफ्रूट्स, वेलची आणि जायफळ पूड टाकून आणि किंचित गूळ घालावा. हे सारण नीट एकजीव करून घ्यावे. सारणाच्या अंदाजाने मैद्या घेऊन त्यामध्ये दूध आणि गरम पाणी घालून नीट मळून घ्यावे. या पिठाच्या आवरणात सारण घालून त्याला कटरच्या साहाय्याने करंजीचा आकार द्या. त्यानंतर गरम तापलेल्या तेलात किंवा तुपात ही करंजी खरपूस तळून घ्यावी.

गुलकंद पंच रवा लाडू

आपण घरी बनवतात असलेल्या साधारण पद्धतीने आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत मात्र त्यामध्ये गुलकंद घालून या पदार्थाला ट्विस्ट देता येणार आहे. यासाठी सर्वात आधी मंद आचेवर रवा खरपूस भाजून घ्या. यामध्ये अंदाजाने पिठीसाखर आणि वेलची पूड घालून मिश्रण करा. हे लाडू वळायला घेताना एकएक लाडूच्या मध्यभागी तयार गुलकंदाची एक छोटी गोळी करून ठेवा.अशाप्रकारे अगदी झटपट गुलकंद पंच असणारे रवा लाडू तयार करता येतील.

सँडविच शंकरपाळी

सँडविच शंकरपाळी बनवताना सर्वात आधी सॉस पॅनमध्ये गूळ वितळवून घ्या आणि त्यात गव्हाचं पीठ घालून एक गोळा बनवून घ्या. शक्य असल्यास या गोळ्याला हलकी वाफ काढून घ्यावी. अन्यथा काही वेळाने या पिठाच्या दोन मोठ्या पोळ्या लाटून घ्या. एका पोळीवर चॉकलेट सिरप घालून त्यावर दुसरी पोळी ठेवा. यानंतर शंकरपाळीच्या आकारात या पोळीचे तुकडे करा. मंद आचेवर गरम तुपात टाळून ही सँडविच शंकरपाळी सर्व्ह करा.

रोझ खोबर बटाटा वडी

सर्वात प्रथम एका कढईत खोबरे, साखर आणि उकडून कुस्करलेले बटाटे घालून भाजून घ्या. हे मिश्रण साधारणपणे गुलाबी होईपर्यंतच परतावे. यानंतर थंड झालेल्या मिश्रणात रोज सिरप घालून एकजीव करून घ्या आणि मग काही वेळाने आपल्याला हव्या त्या आकारात या मिश्रणाच्या वड्या पाडा.

मसालेदार चंद्रकोर

सर्वात आधी रवा, मैदा, ओवा, मिरपूड आणि मीठ असे सर्व एकत्र करून घ्या. या पिठात गरम तेलाचे मोहन आणि पाणी घालून नीट मळून घ्या. काही वेळाने पीठ मुरून तयार झाल्यावर त्याची पोळी लाटा आणि यावर वाटीच्या किंवा कटरच्या आकाराने चंद्रकोर कापून घ्या. या चंद्रकोर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि मग त्यावर चाट मसाला भुरभुरुन घ्या.

DATE With स्नेहलता वसईकर (पहा दिवाळी विशेष खास फराळ रेसिपी)

दिवाळीच्या सणाला फराळाची लज्जत चाखत सेलिब्रेट करण्याची मजा काही औरच असते पण बऱ्याचदा दिवाळी संपून सुद्धा महिनाभर हा फराळ उरलेला असतो काहीवेळा टाकून सुद्धा द्यावा लागतो. त्याच्याऐवजी हे पटकन बनणारे आणि चटकन संपणारे पदार्थ बनवून तुम्ही तुमच्या पाककौशल्यांचे प्रदर्शन करू शकता.