Tukaram Beej 2021: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये संचारबंदीचे आदेश; फक्त 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार 'तुकाराम बीज' सोहळा
Sant Tukaram Maharaj Devsthan (Photo Credits: Wikimedia Commons)

फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम यांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' (Tukaram Beej) म्हणून ओळखला जातो. या दिवसाचे औचित्य साधून देहू (Dehu) येथील संत तुकाराम महाराज देवस्थानाला (Sant Tukaram Maharaj Devsthan) हजारो भक्त भेट देतात. मात्र यंदा राज्यावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट असल्याने सरकारने अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. यावर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ 50 लोकांना परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती, पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी दिली. वाढत्या कोविड-19 प्रकरणांमुळे, रविवारी पहाटे पासून 30 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत देहू गावात संचारबंदी घालण्यात आली आहे.

सामान्य परिस्थितीत, लाखोंच्या संख्येने भाविक मुख्यत्वे वारकरी संप्रदायातील लोक दरवर्षी तुकाराम बीज सोहळ्याचे औचित्य साधत देहू येथे दाखल होतात. मात्र यंदा त्यावर गदा आली आहे. गेल्या वर्षीही हा सोहळा लॉकडाऊनमध्ये साजरा करण्यात आला होता. सध्या कोरोनाच्या काळात अनेक मंदिरे बंद आहे, मात्र वारकरी संप्रदायातील एक नेता बंड्यातात्या कराडकर यांनी, भक्तांना मोठ्या संख्येने 'तुकाराम बीज' दिवशी देहू येथे येण्यास सांगितले. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहू शहरात बंदीची घोषणा केली.

आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे की, वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर तुकाराम बीज सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा केला जाईल व त्यासाठी केवळ 50 जणांना हजेरी लावता येईल. पोलिस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले, वारकरी संप्रदायातील कराडकर यांनी सोशल मीडियावर आणि मुलाखतीत आवाहन करत भाविकांना देहू येण्यास सांगितले. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. जर वारकरी मोठ्या संख्येने देहूला आले तर त्यामुळे कोविडचा वेगाने प्रसार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त वारकरी संप्रदायाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत.

सध्या पोलिसांनी देहू, विठ्ठलवाडी, मालवाडी, येळवाडी आणि भंडारा डोंगर भागात रविवारी सकाळपासून 30 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कर्फ्यू लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.