
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या (Shri Swami Samarth Punyatithi 2025 Date) निमित्ताने जोरदार तयारी सुरु आहे. येत्या 26 एप्रिल 2025 रोजी महाराजांची पुण्यतिथी आहे. महाराष्ट्रातील आध्यात्मिक गुरुंपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे एक अवतार मानले जातात. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने अक्कलकोटला हजेरी लावतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभिषेक, महाप्रसाद, भजन संध्या, आणि प्रवचन सत्रांचा समावेश आहे.
विशेष व्यवस्थांची तयारी
मंदिर प्रशासनाने भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवक, सुरक्षा रक्षक आणि वैद्यकीय सेवा यांची पुरेशी व्यवस्था केली आहे. तसेच वाहतूक व स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला आहे. राज्यातील विविध भक्त मंडळांद्वारे महाप्रसादाचे आयोजन तसेच मोफत निवास व सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
ऑनलाइन दर्शनाचीही सोय
ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, त्यांच्यासाठी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच यूट्यूब चॅनेलवरून थेट प्रक्षेपण (Live Streaming) करण्यात येणार आहे. अनेक भजन मंडळांनी विशेष भक्ती संध्या आयोजित केल्या आहेत.
श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी श्रद्धेने आणि भक्तीभावाने साजरी करण्यात येत आहे. भाविकांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.