
भारतातील शूर तसेच थोर पुत्रांपैकी एक असलेले, महाराष्ट्राचे महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या, 19 फेब्रुवारी 2023 रोजी जयंती (Shivaji Maharaj Jayanti 2023). यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला.
मराठा साम्राज्याचे संस्थापक समजल्या जाणाऱ्या शिवरायांनी विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध सैन्याच्या तुकड्या आणि सुसंघटित प्रशासकीय कारभाराच्या मदतीने उत्तम स्वराज्य स्थापन केले. त्यांनी युद्धशास्त्रात नाविन्यपूर्ण गोष्टी घडवून आणल्या. गनिमी कावा ही युद्धाची नवीन शैली विकसित केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनरुज्जीवन केले. पुढे रायगड किल्ल्यावर 1674 मध्ये त्यांचा औपचारिकपणे छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला.
उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या थाटात साजरी केली जात असून त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर शिवजयंतीच्या या विशेष प्रसंगी तुम्ही खास मराठी HD Images, Greetings, Wishes, Messages, Facebook आणि Whatsapp Status शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.





दरम्यान, कोणत्याही मराठी व्यक्तीसाठी शिवजयंतीचा दिवस एकाद्या सणापेक्षा कमी नाही. नुसते महाराजांचे नाव, ‘जय भवानी जय शिवाजी’ची ललकार आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाते. महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता म्हणूनच शिवप्रेमींसाठी हे ठिकाण एखाद्या मंदिरासारखे आहे. (हेही वाचा: शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023' चे आयोजन; जाणून घ्या कार्यक्रम)
माहितीनुसार, 1869 साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती.