Shiv Pratap Din (Photo Credits: File)

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप ... ही मूलमंत्र जरी पाळला तरी रोज आपल्याला सकारात्मता मिळेल अशा एक एक घटना इतिहासाच्या पानावर आढळतात. करोडो मराठ्यांचे रक्त सळसळवणारी आणि छाती अभिमानाने फुलवणारी घटना म्हणजे अफजल खानाचा वध! अफजल खानाचा वध करताना शिवरायांनी दाखवलेलं शौर्य जितकं अभिमानास्पद आहे तितकीच वाखाण्याजोगी आहे त्यांची दूरदुष्टी. 10 नोव्हेंबर 1659 दिवशी घडलेली ही घटना शिवप्रेमी ' शिवप्रताप दिन' (Shiv Pratap Din) म्हणून साजरा करतात.

प्रतापगडावर अफजल खानाने शिवरायांना बोलावून दगाफटका करण्याचा डाव आखला होता. छत्रपती शिवाजी महाराज चतुर आणि दूरदुष्टी असणारे प्रशासक होते. त्यांनी अफजल खानाच्या मनातील हा डाव त्याच्या भेटीपूर्वीच ओळखला होता. त्यानुसार अंगात चिलखत आणि हातात वाघनखं घेऊन ते भेटीला पोहचले होते. अपेक्षेप्रमाणे जेव्हा अफजल खानाने शिवरायांना मिठीत दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी प्रतिकार करत आपल्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला.

यंदा शिवभक्त 363 वा शिवप्रताप दिन साजरा करणार आहे. कोरोना संकटानंतर आता जनजीवन पुन्हा निर्बंधमुक्त झालं असल्याने प्रतापगड पुन्हा गजबजण्याची शक्यता आहे. प्रतापगडावर देवीची पूजा केली जाते. ध्वजारोहण करून नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक, पुष्पहार अर्पण केला जातो. याशिवाय महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीचंही आयोजन गडावर केले जाते.

आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा वध करून शिवरायांनी मराठ्या साम्राज्यासोबतच अनेक सामान्य नागरिकांना देखील मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे सामान्यांकडूनही राजेंप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.