Savitribai Phule Jayanti 2025 HD Images in Marathi: भारतातील पहिल्या शिक्षिका, समाजसुधारक, स्त्री-शिक्षणाच्या प्रणेत्या, विषमता- अंधश्रद्धा-अस्पृश्यता यांना कडाडून विरोध करणाऱ्या नेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज, 3 जानेवारी 2025 रोजी जयंती (Savitribai Phule Jayanti 2025). त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची दारे खुली केली व आज त्यांच्यामुळेच देशातील महिला विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्या गावात झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झाले.
ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षित केले. त्यानंतर 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पण मुलींना शिकवण्याचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना, तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या. यावेळी त्यांना समाजाच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले मात्र तरी त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले.
स्त्री शिक्षणासोबतच सावित्रीबाईंनी अनेक रूढी- परंपरा यांच्यामध्येही सुधारणा केल्या. त्यांनी विधवा महिलांसाठी पुनर्विवाहाचा प्रचार केला. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. आपल्या काव्यांतून स्त्रीशिक्षण, सामाजिक परिवर्तन, आणि समानतेचा संदेश दिला. सावित्रीबाई या पहिल्या महिला शिक्षिका, समाज सुधारक व लेखिका म्हणून देखील ओळखल्या जातात.
तर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खास Messages, Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या शुभेच्छा!
सावित्रीबाईंचे जीवन आणि कार्य हे सामाजिक सुधारणा, स्त्री-शिक्षण, आणि समतेच्या विचारांचे प्रतीक आहे. त्यांच्या विचारांनी आजही लाखो लोकांना प्रेरणा मिळते आणि समाजसुधारणेचा मार्ग सुकर होतो. 1873 साली स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजामध्येही सावित्रीबाईंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अशाप्रकारे सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेसाठी दिलेले योगदान अजरामर आहे.