Sankashti Chaturthi November 2020: संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीची आराधना करण्यासाठी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजाविधी
Sankashti Chaturthi May 2020 | (Photo Credits: Instagram)

आश्विन महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2020) फार विशेष असते. याच दिवशी करवा चौथचे व्रत देखील असते. यंदा ही संकष्टी 4 नोव्हेंबर रोजी आली आहे. या संकष्टी निमित्त गणपतीला प्रसन्न करण्यासाठी त्याची पूजा अर्चा केली जाते. त्याची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी यासाठी भाविक गणपतीची आराधना करतात. त्यासाठी उपवास धरतात आणि मग चंद्रोदयानंतर हा उपवास सोडून अन्नग्रहण केले जाते. आज संकष्टीसाठी चंद्रोदयाची वेळ रात्री 8 वाजून 12 मिनिट अशी आहे. त्यामुळे भक्तांनी या वेळेनुसार गणेशाची योग्य आणि साग्रसंगीत पद्धतीने आराधना करावी.

संकष्टी चतुर्थी तिथीला आज सकाळी 3 वाजून 24 मिनिटांनी सुरुवात होणार असून 5 नोव्हेंबरला सकाळी 5 वाजून 14 मिनिटांनी समाप्त होईल. हेदेखील वाचा- Sankashti Chaturthi November 2019: संकष्टी चतुर्थी दिवशी असे करा श्रीगणेशाचे व्रत; काय आहे आजची चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या सविस्तर

संकष्टी चतुर्थी निमित्त गणरायाची पूजा कशी कराल?

चौरंगाखाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू वाहा. त्यावर चौरंग ठेवून चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर ताम्हणात गणराची मुर्ती/प्रतिमा ठेवावी. त्याला पाणी-दूधाचा अभिषेक करावा. त्यानंतर स्वच्छ कपड्याने मुर्ती/प्रतिमा पुसून घ्यावी आणि चौरंगावर मांडावी. गणरायाच्या मुर्ती शेजारी तांदळाने चंद्रकोर काढावी. त्यानंतर पाच फळं किंवा पाच केळी समोर ठेवावी. नारळ, पानाचा विडा सुपारी सह मांडावा. दिवा लावावा.

त्यानंतर प्रथम दिव्याला हळद-कुंकू वाहावे. अक्षता-फुलं वाहून नमस्कार करावा. मग गणरायाच्या मुर्ती/प्रतिमेवर हळद-कुंकू, अक्षता वाहाव्या. त्यानंतर विडा, बाजूला काढलेला तांदळाचा चंद्र, नारळ यावर हळद-कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी. त्यानंतर फुलं वाहून प्रार्थना करावी. दिवा-अगरबत्ती ओवाळावी. नारळ, फळांचा नैवेद्य दाखवावा. (शक्य असल्यास त्यावर तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवा.) नमस्कार करुन मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर घरी शिजवलेल्या सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी. अखेरीस आकाशातील चंद्राचं दर्शन घ्यावं आणि उपवास सोडावा.