Sankashti Chaturthi March 2020 (Photo Credits: Pixabay)

Sankashti Chaturthi March 2020 Moon Rise Time: प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थ्या असतात. शास्त्रानुसार, अमावस्येनंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला 'विनायक चतुर्थी' असे म्हणतात. तर पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' असे म्हणतात. मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज गुरुवार, 12 मार्च रोजी आहे. गणेशभक्तांसाठी हा दिवस अतिशय खास असतो. या दिवशी गणेश मंदिरात भक्तांची गर्दी जमते. तसंच या दिवशी गणरायाला फुलांची आरास, गोडाधोडाचे नैवेद्य असल्याने बाप्पाचा थाट काही खासच असतो. अनेक मंदिरांमध्ये चंद्रोदयाची वेळी आरती केली जाते. तर घरोघरीही गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. काही गणेशभक्त चतुर्थीनिमित्त उपवास देखील करतात.

आयुष्यातील संकट, विघ्न दूर करुन सुख, समृद्धी, आनंद, यश लाभावे म्हणून विघ्नहर्त्याची पूजा करुन त्याची प्रार्थना केली जाते. मुंबईतील सिद्धीविनायक आणि पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. (संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या गणपती बाप्पाच्या 'या' खास आवडत्या गोष्टी)

संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ

12 मार्च 2020 दिवशी चंद्रोदय रात्री 9:39 वाजता होणार आहे. त्यामुळे उपवास करणारे गणेशभक्त रात्री 9 वाजून 39 मिनिटांनी चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडू शकतात.

संकष्टी चतुर्थीला गणरायाची विधीवत पूजा करुन आरती केली जाते. गणरायाला प्रिय असलेले लाल जास्वंदाचे फुल, दुर्वा, शमीची पाने अर्पण केली जातात. तसंच घरी तयार केलेल्या सात्विक भोजनाचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो. साधारणपणे संकष्टी चतुर्थी दिवशी उकडीचे मोदक करण्याची पद्धत आहे. काहीजण गव्हाच्या पीठाचे तळलेले मोदकही करतात. मात्र अनेकदा धावपळीत किंवा वेळेअभावी एखादा गोड पदार्थ भोजनात करुन त्याचाही नैवेद्य दाखवला जातो.

गणपती ही विद्या आणि कलेची देवता असून गणपतीला 14 विद्या आणि 64 कला अवगत आहेत, असे मानले जाते. त्यामुळे इच्छित फळप्राप्तीसाठी गणरायाची मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते.