यावेळी प्रजासत्ताक दिन 2023 उत्सवांसाठी (Republic Day 2023) इजिप्तच्या अध्यक्षांना मुख्य पाहुणे म्हणून निमंत्रित केले गेले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, इजिप्शियन अध्यक्ष अब्देल फताह अल-सीसी (President of Egypt Abdel Fattah El-Sisi) रिपब्लिक डे 2023 साठी परदेशी पाहुणे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल-सिसी यांना पाठवलेले औपचारिक निमंत्रण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 16 ऑक्टोबर रोजी त्यांना सुपूर्द केले. दोन्ही देशांनी यावर्षी राजकीय संबंधांचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला आहे. गेल्या महिन्यात, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इजिप्तला भेट दिली.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह यांना 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण पाठवले होते, जे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी 16 ऑक्टोबर रोजी त्यांना सुपूर्त केले. आता राष्ट्रपतींनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. मंत्रालयाने सांगितले की, इजिप्तचे राष्ट्रपती पहिल्यांदाच भारतातील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असतील. इजिप्तला 2022-23 मध्ये भारतातील जी-20 च्या अध्यक्षपदाच्या वेळी अतिथी देश म्हणून आमंत्रित केले गेले आहे.
1950 पासून मैत्रीपूर्ण देशांचे नेते प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होत आहेत. 1950 मध्ये इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 1952, 1953 आणि 1966 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला कोणताही परदेशी नेता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिला नाही. 2021 मध्ये तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, परंतु ब्रिटनमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे त्यांनी आपला दौरा रद्द केला होता. (हेही वाचा: World’s Most Popular Leaders: तब्बल 77% मान्यता रेटिंगसह PM Narendra Modi ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते)
या वर्षी भारताने पाच मध्य आशियाई प्रजासत्ताकांच्या नेत्यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. त्याच वेळी, 2018 मध्ये दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या (ASEAN) सर्व 10 देशांचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उपस्थित होते. 2020 मध्ये, ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (2015), रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (2007), फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी (2008) आणि फ्रँकोइस ओलांद (2016) हे देखील यापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत.