
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Images in Marathi: उद्या म्हणजेच, 6 मे 2025 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी (Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025). कोल्हापूर संस्थानाचे राजे आणि समाजसुधारक म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या शाहू महाराजांचा हा स्मृतिदिन सामाजिक समता, शिक्षण आणि शोषित वर्गाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेल्या कार्याला वंदन करण्याची संधी आहे. त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘लोकराजा’ आणि ‘राजर्षी’ ही पदवी मिळाली. ही पुण्यतिथी केवळ त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नाही, तर त्यांनी घालून दिलेल्या समतेच्या तत्त्वांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा देणारी आहे.
शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे कुटुंबात यशवंतराव म्हणून झाला. 1884 मध्ये कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेल्यानंतर ते शाहू महाराज म्हणून ओळखले गेले. 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी 28 वर्षे कोल्हापूर संस्थानावर राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, शेती, उद्योग आणि सांस्कृतिक विकासासाठी अनेक क्रांतिकारी पावले उचलली. शाहू महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न. त्यांचे विचार आजही जातीवाद, असमानता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणादायी आहेत.
अशा या थोर राजाला Messages, Images, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन.
दरम्यान, शाहू महाराजांनी शिक्षणाला दिलेले महत्त्व आणि मागासवर्गीयांच्या सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न आजही अनेक शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक योजनांमधून दिसतात, जसे की ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना’, जी मराठा आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते. 6 मे 1922 रोजी मुंबईत शाहू महाराजांचे निधन झाले, परंतु त्यांचा वारसा आजही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात जिवंत आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूरात त्यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली जाते आणि काही काळ मौन पाळले जाते. या दिवशी राज्यभरात विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये त्यांच्या कार्यावर चर्चा आणि त्यांच्या विचारांचा प्रचार केला जातो.