Pandharpur Wari 2020: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज आळंदीहून होणार प्रस्थान, असा असेल कार्यक्रम
Vitthal Rukmini And Sant Dnyaneshwar (Photo Credits: Wikimedia Commons)

Sant dnyaneshwar Palkhi Prasthan 2020: महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायातील लोक वर्षभरात ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात तो आषाढी एकादशी सोहळा. लाखोंच्या संख्येने विठुरायाच्या दिशेने पंढरपूरची वारी करणा-या वारक-यांसाठी हा भव्यदिव्य सोहळा म्हणजे जणू पर्वणीच असते. यंदा कोरोना व्हायरसमुळे या वारी वर विरजण पडले असले तरीही वारकरी घरातून आपल्या विठुरायाची पूजाअर्चा करत आहेत. दरम्यान यंदा आषाढी वारी 2020 (Ashadhi Wari) वर कोरोना व्हायरसचं (Coronavirus) सावट असल्याने अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सुरू झाला आहे. काल 12 जूनला देहूहून संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Palkhi) आणि पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या (Sant Eknath Maharaj) पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर आज आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल.

आळंदीहून आज संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांचे पालखीतून प्रस्थान होणार आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी माऊलींच्या आजोळ घरी जाईल. या सोहळ्यास मंदिर परिसरात केवळ 50 वारकऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असेल. यानंतर दशमीला पुढील निर्णयानुसार पालखी पंढरपूरला प्रस्थान (Palkhi Prasthan Sohala 2020) करेल. Pandharpur Wari 2020: देहू मधून आज संत तुकाराम महाराज तर पैठण मधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; कोरोनामुळे पायी वारी रद्द

कोरोना व्हायरसच्या सावटामुळे पायी वारी रद्द झाल्यामुळे वारक-यांच्या हिरमोड झाला आहे. महाराष्ट्रात सुमारे 300-400 वर्षांपेक्षा जुनी आषाढी एकादशी निमित्त पायी वारी निघते. मात्र यंदा या भव्य सोहळ्यामध्ये खंड पडला आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकार सोबत झालेल्या चर्चेमध्ये सुवर्ण मध्य काढत वारकर्‍यांनी कोरोना व्हायरसचं जागतिक संकट पाहता पायी दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बदल केले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करत यंदा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान 1 जुलै दिवशी आषाढी एकादशी असल्याने 30 जून पर्यंत पालखी मंदिरामध्येच राहील. तर सरकारच्या पुढील आदेशाप्रमाणे दशमीला पंढरपुरला पादुका घेऊन जाऊन त्याचं पूजन केलं जाणार आहे.