हिंदू कलेंडरनुसार, यंदा अधिक मास हा एक अतिरिक्त महिना आल्याने सध्या अधिक अश्विन मास सुरु आहे. 3 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत हे पर्व सुरु राहणार आहे. दरम्यान, 16 ऑक्टोबर रोजी अधिक मास समाप्त होईल आणि अगदी दुसऱ्या दिवशी पासून नवरोत्सवाला प्रारंभ होईल. नवरात्र, दसरा, कौजागिरी पौर्णिमा यांसह अनेक सह या महिन्यात येत आहेत. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे सर्वच सण अगदी साधेपणाने साजरे करावे लागणार आहेत. तर पाहुया ऑक्टोबर 2020 मध्ये येणारे सण, उत्सव यांची यादी: (Gandhi Jayanti 2020 Messages: गांधी जयंतीच्या शुभेच्छा मराठी Wishes, Quotes द्वारा WhatsApp, Facebook Status वर शेअर करत साजरा करत महात्मा गांधीजींचा जन्मदिन)
2 ऑक्टोबर: गांधी जयंती
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस देशभरात 'गांधी जयंती' म्हणून साजरा केला जातो.
5 ऑक्टोबर- संकष्टी चतुर्थी
दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी निमित्त गणेश मंदिरांमध्ये त्याचप्रमाणे घरोघरी गणपती बाप्पाची पूजा केली जाते.
13 ऑक्टोबर- कमला एकदशी
अधिक महिन्यातील एकदाशीला अत्यंत महत्त्व असते. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात काही कृष्ण भक्त महिनाभर उपवास करतात. तर ज्यांना शक्य नसते ते एकादशी दिवशी व्रत ठेवतात. हे व्रत केल्याने मनातील साऱ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, असे मानले जाते.
16 ऑक्टोबर- अधिक मास समाप्ती
18 सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या अधिक मासाची समाप्ती 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
17-25 ऑक्टोबर- नवरात्रोत्सव:
17 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवशी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात देवीचे आगमन होते. घरोघरी घटस्थापना होते. काहीजण देवीच्या मुर्तीचीही स्थापना करतात. नवरात्रोत्सवाच्या काळात देवींच्या मंदिरात भाविकांची गर्दी जमते. दांडिया, गरबा यांची धूम सर्वत्र पाहायला मिळते. मात्र यंदा कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी आहे. अष्टमीच्या मंदिरांमध्ये होम केले जातात. घरोघरी कन्या पूजनाचा कार्यक्रम पार पडतो.
25 ऑक्टोबर- दसरा
साडेतीन मुहुर्तांपैकी एक दसरा रविवार 25 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. या दिवशी सरस्वती पूजन, शस्त्रपूजन केले जाते. आपट्याची पाने वाटून रावणवधाचा आनंद साजरा केला जातो. असत्यावर सत्याने मिळवलेला विजय म्हणून विजयादशमी भारतभर साजरी होती. दरम्यान, यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे शिवसेना, मनसेचा दसरा मेळावा देखील रद्द करण्यात येतील, असे दिसून येते.
30 ऑक्टोबर: कौजागिरी पौर्णिमा, ईद-ए-मिलाद
कौजागिरी पौर्णिमेचा सण आणि ईद एकाच दिवशी साजरी केली जाणार आहे. कौजागिरी पौर्णिमेनिमित्त सजग राहण्याचा संदेश दिला जातो. जो सजग राहतो त्याच्यापाशी लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते. तसंच या दिवशी दूधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचे सेवन केले जाते.
2020 मधील अनेक सण-समारंभांवर कोरोना व्हायरस संकटाचे सावट होते. त्यामुळे गुढीपाडव्यापासून सर्वच सण अगदी घरगुती स्वरुपात साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. अद्याप कोविड-19 चे संकट टळलेले नसल्याने यापुढील सर्वच सण साध्या पद्धतीने साजरे करावे लागणार आहेत.