No Shave November (Photo Credits: File Image)

No Shave November 2020 Meaning & Rules: नोव्हेंबर महिना हा सोशल मीडियाच्या जगात ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणून ओळखला जातो. या महिन्यात ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ (No Shave November) शिवाय ‘मूव्हंबर’ (Movember) नावानेदेखील एक खास मोहीम चालवली जाते. जगभरात गेल्या अनेक वर्षांपासून नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही मोहीमा सुरू आहेत. या दोन्ही मोहीमागील उद्देश कॅन्सरबद्दल जनजागृती करणं हा आहे. साधारणत: कर्करोग झालेल्या रुग्णाचे केस गळतात. त्यामुळे आपण केस वाढवून, दाढी न करता पैसे वाचवून ते कॅन्सरग्रस्तांसाठी आणि पुरुषांना होणाऱ्या आजारांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थाना दान करायचे, असाही या मोहीमागील महत्त्वाचा उद्देश आहे. नोव्हेंबर महिना लागला की, सोशल मीडियावर ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा ट्रेंड होता. जगभरातील अनेक तरुण या ट्रेंडला चांगला प्रतिसाद देतात. आज आपण या लेखातून 'नो-शेव्ह नोव्हेंबर' आणि 'मूव्हंबर' म्हणजे काय? आणि याचा कर्करोगाशी कसा संबंध आहे हे जाणून घेऊयात.

'नो-शेव्ह नोव्हेंबर' - No-Shave November

'नो-शेव्ह नोव्हेंबर' ही महिनाभर चालणारी मोहीम असून या मोहीमेअंतर्गत कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी जागरूकता आणि निधी जमा केला जातो. याद्वारे कर्करोगाच्या संशोधन, शिक्षण आणि त्यावरील उपचार / प्रतिबंधासाठी मोहिमा आयोजित केल्या जातात आणि निधी जमा केला जातो. सोशल मिडियावर तसेच ऑफलाइन देखील ही मोहिम राबवली जाते. ज्याचा हेतू केमोथेरपीमुळे केस गमावावे लावलेल्या कर्करोग झालेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढविणे हा आहे. ( हेही वाचा -  World Vegan Day 2020: Vegetarianism आणि Veganism मध्ये नेमका फरक काय?)

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेचा इतिहास -

ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात 1999 मध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही मोहीम सुरू केली होती. दरवर्षी जगभरात ‘वर्ल्ड बिअर्ड अँड मुस्टॅश कॉम्पिटिशन’ ही स्पर्धा घेतली जाते. त्यातून ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही संकल्पना पुढे आली. त्यानंतर या मोहिमेचं आवाहन स्विकारणाऱ्या तरुणांनी ही संकल्पना सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा ट्रेंड आला. महिनाभरात दाढी करण्यासाठी जेवढे पैसे लागतात, तेवढे पैसे कर्करोग झालेल्या रुग्णासाठी दान करण्याची प्रथा पुढे आली. ही चळवळ जगभरात प्रसिद्ध झाली. तेव्हापासून नोव्हेंबर महिन्यात तरुण पैसे जमा करून ते कर्करोग झालेल्या रुग्णांच्या सेवेसाठी स्वयंसेवी संस्थाना दान करतात.

'नो-शेव्ह नोव्हेंबर'चे नियम - No-Shave November Rules

'नो-शेव्ह नोव्हेंबर'चे नियम अत्यंत सोपे आहेत. आपल्याला नो-शेव्ह नोंव्हेंबर नावातचं या मोहिमेच्या नियमांची कल्पना समजते. नो-शेव्ह नोंव्हेंबर मोहिमेमध्ये महिनाभर म्हणजेचं 30 दिवस पुरुष दाढी करत नाहीत. आपण आपल्या दाढीची देखभाल करण्यासाठी जे काही पैसे खर्च कराल, ते तुम्ही या मोहिमेसाठी देणगी म्हणून देऊ शकता. या मोहिमेचे नियम अगदी सोपे आहेत. याशिवाय या मोहिमेअंतर्गत तुम्ही #NoShaveNovember फोटो पोस्ट करू शकता आणि इतरांनादेखील यात भाग घेण्यास प्रोत्साहित करू शकता.

मूव्हंम्बर - Movember

नो-शेव्ह नोव्हेंबर आणि मूव्हम्बर या दोन्ही मोहिमा थोड्याफार प्रमाणात सारख्या आहेत. 2003 मध्ये मूव्हंम्बर फाऊंडेशनने ऑस्ट्रेलियामध्ये मूव्हंबर मोहिमेची सुरुवात केली होती. नो-शेव्ह नोव्हेंबर प्रमाणेचं मूव्हंबर हीदेखील एक जागतिक चळवळ आहे. ज्यामध्ये 21 देशांचा समावेश आहे. मात्र, या मोहिमेचे लक्ष केवळ मिशावर आहे. या दोन्ही मोहिमा पुरुषांच्या वैद्यकीय समस्यांकडे लक्ष वेधून घेतात.