स्वामी विवेकानंदांची (Swami Vivekananda) जयंती, म्हणजेच 12 जानेवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार 1984 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय युवा वर्ष' म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन, भारत सरकारने 1984 पासून, 12 जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशात सर्वत्र साजरा करण्याची घोषणा केली. या संदर्भात भारत सरकारचे असे मत होते की. ‘स्वामीजींचे जीवन आणि कार्य, त्यांचे तत्त्वज्ञान, आदर्श हे भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.’
स्वामी विवेकानंद हे भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्वांपैकी एक होते. आजही देशातील लाखो तरुणांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. दरवर्षी विवेकानंद जयंती केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे, सामाजिक संस्था आणि रामकृष्ण मिशनचे अनुयायी मोठ्या सन्मानाने साजरी करतात. या दिवशी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
तर यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत तुम्ही तुमचे कुटुंबीय, शेजारी, मित्र यांना Messages, HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, आपल्या प्रतिभावान तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीच्या वैश्विक बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी, दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान कर्नाटकातील हुबळी-धारवाड येथे आयोजित केला आहे.
यंदाच्या महोत्सवाची थी, ‘विकसित युवक - विकसित भारत’ अशी आहे. हा दिवस देशातील तरुणांसाठी साजरा केला जातो आणि त्यांना विवेकानंदांचे विचार आणि तत्त्वज्ञान स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2023 रोजी कर्नाटकात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. हा भारताचा 26 वा राष्ट्रीय युवा महोत्सव असेल.