
महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो. काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असल्याने यंदाचा मराठी भाषा गौरव दिन हा खास असणार आहे. भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे आणि जगात 83 दशलक्ष पेक्षा अधिक लोकं ही भाषा बोलतात. मराठी भाषेमध्ये सुमारे 42 बोली भाषा देखील आहे. त्यामुळे या भाषेचं वैविध्य देखील आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रांतानुसार त्याचा लहेजा, वाक्यरचना, व्याकरण बदलतं. मग अशा या मराठी भाषेचा जागर करण्यासाठी 27 फेब्रुवारी हा दिवसच का निवडला गेला आहे? यामागची खास गोष्ट नक्की जाणून घ्या.
मराठी भाषा गौरव दिन महत्त्व
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीचं औचित्य साधून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचा गौरव आणि संवर्धन करणं हे या दिवसाच्या सेलिब्रेशन मागील मुख्य कारण आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी शिरवाडकरांनी अथक परिश्रम घेतले आहेत. 21 जानेवारी,2013 पासून राज्य सरकार कडून मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. मराठी भाषेचं सौंदर्य अधिक खुलवतात महाराष्ट्रातील या '14' मजेशीर बोली भाषा.
मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन मध्ये फरक काय?
मराठी भाषा गौरव दिन हा वि वा शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तर मराठी राजभाषा दिन हा 1 मे दिवशी साजरा केला जातो. प्रांतवार राज्य निर्मिती झाल्यानंतर 1 मे 1960 दिवशी मराठी भाषिकांना मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मिळला त्यानंतर वसंतराव नाईक सरकारने 1965 पासून 1 मेला मराठी राजभाषा दिन साजरा करण्यास सुरूवात केली. 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. 1966 पासून तो अंमलात आला.
मराठी भाषा गौरव दिन निमित्त मराठी भाषेचा जागर करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी या दिवशी विशेष प्रयत्न केले जातात. त्यानिमित्त विविध माध्यमातून मराठी साहित्य जनमाणसात पोहचवले जाते.