Dr Babasaheb Ambedkar | Wikipedia

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी (Mahaparinirvan Din 2023), दि. 6 डिसेंबर 2023 रोजी बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत आणि चित्रपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून होणार आहे. तसेच आकाशवाणीवरून ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे.

‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी 11 वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी 1 वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायं. 7.30 वा. ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमामधून उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. माहितीपट, मुलाखत व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक –  https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. यासह ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी 1981 मध्ये ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे. तर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.

दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दादर, शिवाजी पार्क येथे माहिती व प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी भोजन स्टॉल उभारण्यात आला असून या स्टॉलवर भोजनाचा एक बॉक्स व एक पाणी बॉटल याचे वाटप करण्यात येत आहे. (हेही वाचा: Mahaparinirvan Din 2023 Special Songs: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही खास भीमगीते ऐकून, महामानवाच्या स्मृतींना द्या उजाळा)

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने पुस्तक स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या पुस्तक स्टॉलवर बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी पुस्तके उपलब्ध आहेत. या माहिती व प्रसिद्धी स्टॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यासारख्या महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके उपलब्ध आहेत. या सर्व पुस्तकांवर 85 % इतकी सूट देण्यात आलेली आहे.