Mahalakshmi Temple, Kolhapur Kirnotsav 2019: नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव (Kirnotsav) सोहळा बुधवारी सायंकाळी भाविकांच्या साक्षीने झाला. मावळतीची किरणे अंबाबाईच्या (Mahalakshmi) मानेपर्यंत पोहोचली. गेल्या वर्षीपासून किरणोत्सव सोहळा पाच दिवसांचा करण्यात आल्याने नियोजित कालावधीच्या पूर्वसंध्येला किरणोत्सवाचे दर्शन भाविकांनी घेतले. देवीच्या मानेपर्यंत पोहोचलेल्या किरणांनी गाभारा उजळून गेल्यानंतर आरती करण्यात आली.
किरणोत्सव 2019 चा पहिला दिवस
सायंकाळी पाच वाजून २३ मिनिटांनी किरणे महाद्वाराच्या कमानीजवळ आली. त्यानंतर पाच वाजून ३२ मिनिटांनी किरणांनी गरुड मंडपातून आत प्रवेश केला. पाच वाजून ४८ मिनिटांनी किरणांची तिरीप गणपती चौकात पोहोचली. तर सहा वाजून चार मिनिटांनी किरणांनी पितळी उंबरा ओलांडला. सहा वाजून दहा मिनिटांनी किरणांचा चांदीच्या पायरीला स्पर्श केला. तर गाभाऱ्याच्या पायरीपर्यंत सहा वाजून ११ मिनिटांनी किरणे पोहोचली. सहा वाजून १३ मिनिटांनी मावळतीच्या किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श करताच गाभाऱ्यातील दिवे मालवण्यात आले. सव्वासहा वाजता किरणे देवीच्या पोटावरून वर सरकत सहा वाजून १७ मिनिटांनी मानेपर्यंत पोहोचली व खाली झुकली. नक्की वाचा: महाराष्ट्रातील देवीची असलेली साडे तीन शक्तिपीठं
बुधवारी हवामान स्वच्छ असल्यामुळे किरणांची तीव्रता प्रखर होती. यावेळी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच भाविकांनी गणपती चौकात गर्दी केली होती. तसेच पर्यटक भाविकांनीही किरणोत्सवाचे दर्शन घेतले. गुरूवारी पारंपारिक कालावधीनुसार किरणोत्सवाचा पहिला दिवस आहे. हवामान स्वच्छ आणि किरणं प्रखर असल्यास मूर्ती अधिक तेजोमय दिसते.