Kedarnath Temple (Photo Credits: Wikimedia Commons)

उत्तराखंडमधील (Uttarakhand) बाबा केदारनाथ (Kedarnath) मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनंतर सोमवारी पहाटे पाच वाजता उघडतील. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना विषाणूमुळे कपाट उघडण्याच्या वेळी भाविक उपस्थित राहू शकणार नाहीत. यासह मंगळवारी 18 मे रोजी चमोली येथील भगवान बद्रीनाथचे दरवाजे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी चार वाजता उघडतील. कोविडमुळे याठिकाणीही भाविकांना प्रवेश नसणार आहे. उत्तराखंड सरकारच्या एसओपीनुसार, केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे उघडण्याच्या वेळी पुरोहित, पुजारी, देवस्थानम व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यासह केवळ 25 लोक उपस्थित असतील.

भगवान केदारनाथचे दरवाजे उघडण्याच्या सर्व तयारी पूर्ण झाल्या आहेत. भव्य मंदिर 11 क्विंटल फुलांनी सजविले आहे. यावर्षीही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे डोली पुन्हा रथातून न्यावी लागली आहे. बाबा केदारनाथचे दरवाजे सोमवारी सकाळी उघडले जाणार आहेत. यापूर्वी शुक्रवार 14 मे रोजी यमुनोत्रीचे आणि शनिवारी 5 मे रोजी गंगोत्रीचे दरवाजे उघडताना हीच प्रणाली लागू केली होती. उत्तराखंडच्या गढवाल हिमालयात चारधाम (Char Dham) या नावाने प्रसिद्ध असलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे दरवर्षी सहा महिन्यांच्या हिवाळ्यातील सुट्टीनंतर भाविकांसाठी एप्रिल-मेमध्ये उघडले जातात.

यंदा भाविकांना चारधाम दर्शन घेण्याची परवानगी नसणार. गेल्या वर्षी उशिरा सुरू झालेली चारधाम यात्रा यावेळी कोविड प्रकरणात वाढ झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. चारधाम यात्रा पुढे ढकलण्याची घोषणा करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी 29 एप्रिलला सांगितले की साथीच्या पार्श्वभूमीवर यात्रेला परवानगी देणे शक्य नाही. (हेही वाचा: काय सांगता? Covid-19 ला देवी समजून महिला करत आहेत 'कोरोना माई'ची पूजा; श्रद्धाळूंचा 21 दिवस पूजेचा संकल्प)

मात्र, चांगली गोष्ट म्हणजे चारधाम यात्रा स्थगित झाली असली तर, देशभरातील भाविक अजूनही बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री धाम पाहू शकतील. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भाविकांना व्हर्च्युअल दर्शनाची सोय होणार आहे. देवस्थानम बोर्ड यासाठी आवश्यक तयारी सुरू करणार आहे. उत्तराखंड पर्यटन सचिव दिलीप जावळकर म्हणाले की, चारधामच्या भाविकांसाठी आभासी दर्शनासाठी रूपरेषा निश्चित केली जात आहे.